महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) सीबीआय कोठडीवरील निर्णय विशेष सीबीआय न्यायालयाने ठेवला राखून आहे. अनिल देशमुखांना दिल्लीमध्ये चौकशीसाठी न्यावे लागेल. त्यामुळे १० दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती सीबीआयने न्यायालयाला केली आहे. मात्र यावर देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला. देशमुखांनी आतापर्यंत तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते दिल्लीपर्यंत प्रवास करू शकत नाहीत, असे देशमुखांचे वकील म्हणाले. थोड्यावेळात देशमुखांच्या कोठडीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुखांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करायची आहे. आर्थर रोड कारागृहातच त्यांची चौकशी करावी, अशी देशमुखांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) 100 कोटी वसुली प्रकरणात ताब्यात घेतले आहे. यापूर्वी देशमुख यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनिल देशमुखांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले असून, त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांना ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. देशमुख यांनी सोमवारी अधिवक्ता अनिकेत निकम यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत सीबीआय कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेलाही आव्हान देण्यात आले होते.