शाळेच्या परीक्षा घेऊ की निवडणुकीच्या प्रशिक्षणाला जाऊ, शिक्षक हतबल
By रेश्मा शिवडेकर | Published: April 1, 2024 07:31 PM2024-04-01T19:31:02+5:302024-04-01T19:31:06+5:30
राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये ४ ते ६ एप्रिल दरम्यान पॅट परीक्षांचे आयोजन करायचे आहे.
मुंबई: शाळांमध्ये संकलित चाचणी-२पासून (पॅट) ते नववी-दहावीच्या निकालाच्या कामापर्यंत अनेक जबाबदाऱ्या असताना निवडणुक प्रशिक्षणाचे काम लागल्याने मुंबईतीलशिक्षक वैतागून गेले आहेत. केवळ पालिका व अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच निवडणुकांचे काम लावण्यात येत आहे. २ एप्रिलपासून प्रशिक्षणाला सुरूवात होत आहे. परंतु, शाळेतच अनंत कामे शिक्षक वैतागून गेले आहेत.
राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमध्ये ४ ते ६ एप्रिल दरम्यान पॅट परीक्षांचे आयोजन करायचे आहे. त्यात तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या एकाचवेळी परीक्षा घ्याव्या लागतात. शाळेत पुरेसे मनुष्यबळ असेल तरच या परीक्षा घेता येतील. त्यात आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन विषयांच्या आणखी एका परीक्षेची भर पडली आहे.
शिवाय दहावीचे वर्ग लवकर सुरू करायचे असल्याने नववीचे निकाल ४ एप्रिलपर्यंत लावण्यास सांगण्यात आले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये पेपर तपासणी आणि निकालाचे काम वेगाने सुरू आहे. अनेक शिक्षकांना दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे कामही लागते. या सगळ्या कामाच्या गोंधळात निवडणुकीचे प्रशिक्षण आल्याने शिक्षक वैतागून गेले आहेत.
संस्थांनी कामे लावताना किमान समन्वय तरी ठेवावा... एससीईआरटी, निवडणुक आयोग, एसएससी बोर्ड यांच्याकडून शिक्षकांना स्वतंत्रपणे कामे लावली जातात. परंतु, शिक्षकांवर कामे टाकताना किमान या संस्थांनी एकमेकांशी समन्वय तरी साधावा. त्यात पुढील आठवड्यात अनेक सुट्ट्या आल्याने कामाचे दिवस कमी झाले आहेत. काही शिक्षकांना तर सुट्टीच्या दिवशीही प्रशिक्षण लावण्यात आले आहे. एकतर मुंबईतील निवडणुकांना ५० दिवस आहेत. इतक्या लवकर प्रशिक्षण लावून शिक्षकांची आणि शाळांची गैरसोय का केली जात आहे. - शिवनाथ दराडे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
पॅटच्या प्रश्नपत्रिका अपुऱ्या
शाळांमध्ये होणाऱ्या संकलित मुल्यमापन चाचणी -२ करिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. मात्र, अनेक केंद्रांवर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. आताही शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या फोटोकॉपी करून घेण्याकरिता धावाधाव करावी लागते आहे.