एलएसडीचे वजन करताना पेपरचे वजन मोजावे की नाही?; एनसीबीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:46 AM2021-06-08T06:46:50+5:302021-06-08T06:47:20+5:30
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी आरोपी अनुज केशवानीने केलेल्या अर्जावर विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला एनसीबीने आव्हान दिले.
मुंबई : एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करताना लाइसर्जिक ॲसिड डायथिलामाइड (एलएसडी)चे वजन कागदासह मोजावे की नाही? हा प्रश्न सोडवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी आरोपी अनुज केशवानीने केलेल्या अर्जावर विशेष एनडीपीएस न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला एनसीबीने आव्हान दिले. केशवानीकडून जप्त केलेले एलएसडीचे वजन हे बोल्ट पेपरसह आहे की पेपरशिवाय केले आहे, याची खात्री करण्यासाठी विशेष एनडीपीएस न्यायालयाने एनसीबीला नमुने गुजरात लॅबला पाठविण्याचे आदेश दिले हाेते.
अपिलावर सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंती एनसीबीने केली. न्या. अजय गडकरी यांनी बुधवारी सुनावणी ठेवली.
पेपरसह वजन गृहीत धरण्याची विनंती
- दोषारोपपत्रात केशवानीकडून जप्त केलेल्या एलएसडीचे वजन ०.६२ ग्रॅम असल्याचे नमूद आहे. एनडीपीएस कायद्यानुसार, एलएसडीसाठी ०.१ ग्रॅम वजन हे व्यावसायिक प्रमाण मानण्यात येते. मात्र, एलएसडीचे वजन पेपरसह धरण्यात आले की पेपरविना, हे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलेले नाही.
- एलएसडी सोल्यूशनचा थेंब वाळलेल्या कागदाच्या तुकड्यावर, जिलेटीन पेपर किंवा ब्लॉटिंग पेपर्सवर टाकतात. त्यामुळे ड्रग्स ज्या प्रकारात विकतात त्याचेही वजन करण्यात येते. त्यामुळे एलसीडीचे वजन करताना पेपरसह वजन गृहीत धरावे, अशी विनंती एनसीबीने केली आहे.