काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत जे कमावले; ते भाजपने पाच वर्षांत गमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:11 AM2019-04-18T06:11:53+5:302019-04-18T06:12:29+5:30

गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने देशासाठी काय केले? असा प्रश्न भाजप विचारतो.

Which the Congress has earned in the past 60 years; They lost BJP in five years | काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत जे कमावले; ते भाजपने पाच वर्षांत गमावले

काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत जे कमावले; ते भाजपने पाच वर्षांत गमावले

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने देशासाठी काय केले? असा प्रश्न भाजप विचारतो. मात्र ज्या देशात साधी सुईदेखील बनत नव्हती; त्या देशाला काँग्रेसने आर्थिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पण काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत देशासाठी जे कमावले ते भाजपने गेल्या पाच वर्षांत गमावले. परिणामी, देशाचे मातेरे झाले, अशी कडवट टीका उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीवेळी केली.
सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असून, हत्या झालेल्या विचारवंतांच्या मारेकऱ्यांना अद्याप शिक्षा झाली नसल्याकडे लक्ष वेधत ऊर्मिला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौºयावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिथिल कारभारावरही सडकून टीका केली. काँग्रेसने काही केले म्हणून देश आज एका वेगळ्या आर्थिक उंचीवर आहे. अर्थकारण उत्तम सुरू असलेला देश ताब्यात आल्यानंतर भाजपने त्याचे मातेरे केले.
बॉलीवूड सोडून राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला?
देशातील वातावरण गेल्या पाच वर्षांत वाईट बनले आहे. विकास, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पन्न वाढीची आश्वासने दिली गेली; पण यापैकी काहीच झाले नाही.
उलट रोजगार गेले. बँकेत सगळ्यांचे खाते असावे हे ऐकताना छान
वाटते. मात्र खात्यात रक्कम नसेल,
तर पैसे कापले जातात. सरकारने गरिबांची चेष्टा केली. पोटाला
भाकरी मिळत नसलेल्यांसाठी काहीच केले नाही. द्वेषाचे, सुडाचे राजकारण सुरू आहे. हक्क हिरावून घेतले
जात आहेत. लोकांना देश सोडून जा, असे सांगितले जात आहे. अशा
काळात सोशल मीडियावर कमेंट लिहून काहीच होत नाही. त्यामुळे चित्र बदलण्यासाठी मी राजकारणात आले.
विरोधकांच्या टीकेला कसे उत्तर द्याल?
- माझे काम आणि मिळणारा पाठिंबा हेच विरोधकांना उत्तर आहे. शाब्दिक, भावनिक उत्तरे ही कामे भाजपची आहेत. गेल्या साडेचार वर्षांत त्यांनी हे काम उत्तम केले आहे. शाब्दिक चकमकींवर माझा विश्वास नाही. मी कामावर विश्वास ठेवते. वेळ हे यावर उत्तर असेल. मी सुसंस्कृत घरातून आले आहे. माझ्या आई-वडिलांनी मला कायम सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. बांधिलकी शिकवली.
नागरिकांची वैचारिक घुसमट होते आहे?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जात आहे; गेले आहे. आमीर खान किंवा नसीरुद्दीन शहा यांना दुसºया देशात जा, असे सांगितले जाते. भरदिवसा पानसरे आणि दाभोळकरांसारख्या विचारवंतांच्या हत्या होतात. गौरी लंकेश यांना
मारले जाते. साडेचार वर्षांत त्याचा तपास लागत नाही. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांना दगडाने
ठेचून मारले जात आहे. अशा
गोष्टी मी यापूर्वी ऐकल्या नव्हत्या. पंतप्रधान यावर बोलत नाहीत. ते जग फिरण्यात व्यस्त असतात. मुख्यमंत्र्यांकडे ११ खाती आहेत. पण त्यांच्याकडे वेळ नाही. भाजपचा कामाचा पाढा भयानक आहे. चीड आणि संताप येण्याजोगा आहे.
तुमच्या शरद पवार आणि मनसेच्या भेटीमागचे राजकारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नेते म्हणून आणि व्यक्ती म्हणूनही मी मानते. मला ते लहानपणापासून ओळखतात. त्यांचे मार्गदर्शन आयुष्यभर कामी येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानते. ही नेहमीचा निवडणूक नाही. ती हुकूमशाही हवी की लोकशाही यासाठी निर्णायक ठरेल. येथील गणिते चुकली तर देशाचे नुकसान होईल. स्वातंत्र्य राहणार नाही.
नवमतदार, तरुणाई आणि महिला मतदारांना काय आवाहन कराल?
तरुणांच्या हाती शक्ती आहे. त्यांच्याकडे पदव्या आहेत. मात्र त्यांना पकोडे तळा आणि विका, असे सांगितले जाते. त्यांनी समाजकारण आणि राजकारण समजून घ्यावे. मरगळ झटकावी. महिलांनी आपली शक्ती आणि अधिकार समजून काम करण्याची गरज आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पक्षात मी आहे. त्यांनी पक्षाला आणि देशाला नेतृत्व दिले. राहुल गांधी यांनीही पाच वर्षांपासून तळागाळात काम केले आहे. त्यांनी आपल्या दु:खाचे भांडवल केले नाही. प्रचंड मेहनत केली. समस्यांवर उपाय शोधले.
समजा, जर ऊर्मिला मातोंडकर विजयी झाल्या; तर पुढे काय?
- काम, काम आणि प्रचंड काम. जिंकणे अंतिम नाही. ही पहिली पायरी आहे. कारण काम खूप आहे. समस्या खूप आहेत. आव्हाने खूप आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. जिंकले तर येथून सुरुवात होईल. मला माझ्या मतदारसंघासह देशातील सर्वसामान्य जनतेसाठी खूप काम करायचे आहे. तरुण पिढीच्या उद्धारासाठी झटायचे आहे. त्या दिशेने माझे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Which the Congress has earned in the past 60 years; They lost BJP in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.