कोणत्या उपकरणांसाठी; किती वापरली अतिरिक्त वीज; वीज ग्राहकांना मिळणार माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:07 PM2020-06-27T18:07:55+5:302020-06-27T18:08:44+5:30
पंखा, दिवे, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर
मुंबई : जुन महिन्यात आलेल्या वीज बिलांनी वीज ग्राहकांना घाम फोडला आहे. अशा परिस्थितीमध्ये वीज ग्राहक सातत्याने तक्रार नोंदवित आहेत. परिणामी वीज ग्राहकांचे समाधान करण्यासाठी महावितरण, टाटा, अदानी या वीज कंपन्या आपआपल्या परिने काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जीवनशैली बदलली आहे, असे म्हणत आता पाठविण्यात येणारी बिले ही ९१ दिवसांची आहेत. या कालावधीत आपले सर्व कुटुंब २४ तास घरातच राहिले होते. अशा परिस्थितीत तब्बल तीन महिने आपण एरवीपेक्षा किती वीज जास्त वापरली, याचा आढावा ग्राहकांनी घ्यावा. याकरीता त्यांनी टाळेबंदीच्या अगोदरचा किंवा गेल्या वर्षीच्या याच महिन्यांमधील वीजवापर पाहून त्याची आताच्या वीजवापराशी तुलना करावी, असे आवाहन टाटा पॉवरने केले आहे.
टाळेबंदीच्या कालावधीत ग्राहकांनी घरगुती उपकरणांवर किती अतिरिक्त वीज खर्च केली, याची माहिती त्यांना मिळण्याची व्यवस्था टाटा पॉवरने आपल्या संकेतस्थळावर केली आहे. त्याबाबतच्या तक्त्यात पंखा, दिवे, रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर यांचा उल्लेख आहे. आपल्या घरात यापैकी कोणती उपकरणे आहेत व आपण ती साधारणतः किती अतिरिक्त तास वापरली याचे आकडे ग्राहकाने या तक्त्यात भरावयाचे आहेत. त्यावरून किती वीज दररोज वापरली, याचा अंदाज ग्राहकाला मिळू शकतो. या सुविधेचा वापर ग्राहक करतील व तिचा त्यांना मोठाच उपयोग होईल. विजेचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याच्या त्यांच्या तक्रारींची दखल यातून परस्पर घेतली जाईल. बिल आकारणीबाबत ग्राहकांना काही शंका असल्यास, त्यांनी २४ तास उपलब्ध असणाऱ्या १९१२३ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा. ग्राहक सहाय्य केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन कंपनीने केले आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीकडून प्राप्त माहितीनुसार, मीटर रिडिंग घेण्याचे काम सुरु झाले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात वीज ग्राहकांना जी वीज बिले पाठविण्यात आली; ती वीज बिले डिसेंबर, जानेवारी, फेब्रूवारी महिन्याच्या सरासरी वीज बिलानुसार होती. एप्रिल आणि मे महिन्यांत बहुतांश ठिकाणी वर्क फॉर्म होम झाले. शिवाय ऊन्हाळा होता. परिणामी विजेच्या मागणीत वाढ झाली. साहजिकच अधिक वीज वापरली गेली. मात्र तेव्हाची वीज बिले ही रिडिंगनुसार नाही तर गेल्या तीन महिन्यातील म्हणजे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यातील वीज बिलांच्या सरासरीवर काढण्यात आली. त्यामुळे ती कमी आली. मात्र आता रिडिंग सुरु झाले असून, त्यानुसार आता पुढील वीज बिले ग्राहकांना येत आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील फरक जुनच्या बिलात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वीज बिले ग्राहकांना व्याजासह हप्तानेसुध्द भरता येणार आहे.
महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहे. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळावे घेण्यात येत आहेत. महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये माहे जून महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल.