तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 07:28 PM2023-06-26T19:28:11+5:302023-06-26T19:48:59+5:30
अवधुत गुप्तेला राजकीय प्रवेश आणि राजकीय पक्षाबद्दल विचारणा करण्यात आली होती.
मुंबई - गायक, दिग्दर्शक आणि निर्माता अवधूत गुप्ते सध्या राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेत असल्याने चांगलाच चर्चेत आहे. खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधुत गुप्ते राजकीय दिग्गजांच्या मुलाखती घेत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतींची सुरुवातच त्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाखतीने केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, संजय राऊत यांच्याही मुलाखती घेतल्या. त्यामुळे, अवधुत गुप्तेंचा कार्यक्रमही चांगलाच चर्चेत आहे. मात्र, आता अवधुतने एका मुलाखतीत राजकीय पक्षाबद्दल भाष्य केलं आहे.
अवधुत गुप्तेला राजकीय प्रवेश आणि राजकीय पक्षाबद्दल विचारणा करण्यात आली होती. तू कोणत्या पक्षात आहेस? असा प्रश्न अवधूतला विचारण्यात आला होता. त्यावर, त्याने स्पष्टपणे सांगितले. ''खरं तर आम्ही कलाकार म्हटल्यानंतर आम्हाला कोणताही पक्ष नाही, असं म्हटलं जातं. पण आम्ही काय वेडे आहोत का? आम्ही काय आंधळे आहोत का? आम्हाला दिसत नाही, ऐकायला येत नाही का? आम्हाला सगळं दिसतं. आमच्या मनामध्ये एक पक्ष असतो, फक्त आमच्या कामामुळे तो पक्ष आम्हाला लोकांसमोर आणून ठेवता येत नाही. आम्ही कुठल्यातरी पक्षाचे असतोच, पण ते आम्ही जाहीरपणे सांगू शकत नाही'', असे म्हणत अवधुत गुप्तेनं मनातील खंत बोलून दाखवली. यावेळी, अवधुतने डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीचं उदाहरण दिलं, डॉक्टर कधी पक्षाचा बोर्ड लावत नाहीत, असे अवधुत म्हणाला. मात्र, आम्हीही मनाने एखाद्या राजकीय पक्षात असतो, असेही त्याने म्हटले.
अवधुत गुप्ते मुंबईत असल्याने मुंबईतील प्रमुख राजकीय पक्षांशी अतिशय सलगीने वागतो. त्यातच, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांसोबत त्याचे खास मैत्रीचे संबधही आहेत. म्हणूनच, त्याने शिवसेना प्रचार गीत लिहलं आणि म्हटलं, ते चांगलंच गाजलं. तर, मनसेचंही नवं प्रचार गीत अवधुतने गुढी पाडव्याच्या मेळाव्यातच गायलं होतं. राज ठाकरेंनीही या गीताबद्दल त्याचं कौतुक केलं होतं. त्यामुळे, अवधुतच्या मनातील नेमका पक्ष कोणता, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. कारण, अवधुत हा शिवसेनेसोबत जेवढा जवळीकचा दिसतो, तेवढाच तो मनसेच्या जवळ आहे.
बाळासाहेबांच्या मैत्रीचा किस्सा
''माझ्या कामाच्या निमित्तानं अनेक राजकीय पक्षांशी माझे संबंध आले. माझं ‘ऐका दाजिबा’ हे गाणं सुपरहिट झाल्यानंतर एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला भेटायला बोलावलं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त करिष्मा होता. त्यांच्याकडे गेल्यावर हरखून जायला व्हायचं. त्यावेळी मी २२-२३ वर्षांचा होतो. अनेकदा ते मला गप्पा मारायला बोलावायचे. आमच्यात तेव्हा ऋणानुबंध निर्माण झाले. शिवसेना पक्षासाठी मी अनेक गाणी केली. जवळपास दहा वर्षं मी शिवसेनेची कामं करत होतो,'' अशी आठवणही या मुलाखतीच्या निमित्ताने अवधुतने सांगितली.