लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलिसांचे ट्विटर अकाउंट त्यांच्या हटके पोस्ट आणि ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यात, मुंबईत कलर कोड सिस्टीम लागू झाल्यापासून मुंबईकरांकडून कलर कोडबाबत विविध प्रश्नांची टिवटिव मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर सुरू आहे. लॉकडाऊनमुळे प्रेयसीला भेटता येत नसल्याने एका तरुणाने थेट मुंबई पोलिसांना, ‘साहेब प्रेयसीची खूप आठवण येत आहे. तिला भेटण्यासाठी कुठल्या स्टिकरचा वापर करायचा’, असे ट्विट केले. पोलिसांनी त्याच्या भावनांचा आदर करत दिलेल्या सडेताेड उत्तरामुळे त्यांचे नेटिझन्सकडून कौतुक हाेत आहे.
मुंबईत वाहन तपासणीदरम्यान होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रविवारपासून खासगी वाहनांसाठी कलर कोडिंग सिस्टीम लागू केली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी लाल रंगाचे, भाजीपाल्याच्या वाहनांसाठी हिरव्या, तर इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर बंधनकारक करण्यात आले आहेत. या कोडबाबत विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नागरिक मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलचा आधार घेत आहेत.
गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास अश्विन विनोद याचे मुंबई पोलिसांना ट्विट आले. त्यात, ‘सर प्रेयसीला भेटण्यासाठी कुठला स्टिकर लावू? तिची आठवण येतेय,’ असे विचारण्यात आले हाेते. पाेलिसांनी ट्विटद्वारे त्याला उत्तर दिले की, आम्हाला हे समजले आहे की, हे आपल्यासाठी आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने ते आमच्या अत्यावश्यक किंवा आपत्कालीन श्रेणींमध्ये येत नाही! दूर राहिल्याने हृदयातील प्रेम अधिक घट्ट होते आणि सध्या आपण स्वस्थ राहा. आमच्याकडून तुम्हाला आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा. हा फक्त एक टप्पा आहे. घरी राहा, सुरक्षित राहा.पाेलिसांनी दिलेल्या या सडेताेड उत्तरामुळे नेटिझन्सकडून पोलिसांचे कौतुक हाेत आहे. त्यात एकाने मुंबई पोलिसांची माफी मागितली. मात्र, पोलिसांनी त्यालाही उत्तर देताना, प्रत्येक मुंबईकर आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या भावनाही आम्ही जाणतो. त्यामुळे माफी मागण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
पाेलिसांच्या ट्विटर हँडलमुळे वाचले अनेकांचे प्राणमुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलमुळे मिळालेल्या मदतीमुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचले आहेत. तर परदेशात अडकलेल्या तरुणालाही एक ट्विटवरून पुन्हा मायदेशी परत येता आले. अवघ्या काही सेकंदात प्रत्येक ट्विटला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मुंबई पोलिसांचे ट्विटर सेल सर्वांसाठी लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस आणि नागरिकांची नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे.