विद्यार्थी, पालकांपुढे प्रश्नचिन्ह; निकालाच्या निकषांबाबत अंतिम निर्णय हाेईना !
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जवळपास २० दिवसांचा कालावधी उलटला आहे तरी अद्याप त्यासंदर्भातील पुढची कार्यवाही काय असणार, याचा कोणताही निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेला नाही. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात येईल, असे तोंडी जाहीर केले असले तरी त्याबाबतही काहीच धोरणात्मक निर्णय न घेतल्याने दहावीचा निर्णय कुठल्या फितीत अडकला, असा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे.
२० एप्रिल २०२१ रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी सुरक्षितता व हित लक्षात घेऊन दहावीच्या परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साेशल मीडियाद्वारे दिली. मात्र, आजतागायत त्यासंदर्भात कोणतेही परिपत्रक किंवा शासन निर्णय विभागाने जारी केलेला नाही. सीबीएसई मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्यात येतील असे घोषित केले. मात्र, त्यासंदर्भात तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका होऊनही कशाच्या आधारावर मूल्यमापन करावे, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे दहावीचे विद्यार्थी, पालक तणावात आहेत. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे याकरिता निकाल वेळेत लावणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित साधले जाईल, असा निर्णय लवकरात लवकर घेण्याची मागणी पालक संघटनांकडून हाेत आहे.
* मूल्यमापनासाठी परीक्षा हाेणार ?
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी शिक्षण विभाग पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांची एकच बहुपर्यायी प्रश्नांची १०० किंवा २०० गुणांची परीक्षा घेण्याचा विचार प्रस्तावित असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. यामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षा रद्द झाल्या म्हणून स्थलांतरित झालेले विद्यार्थी आता पुन्हा येऊन परीक्षा कशी व केव्हा देणार, परीक्षेचे स्वरूप काय असणार, असे अनेक प्रश्न विद्यार्थी, पालकांना सतावत आहेत.
* परीक्षा रद्दची कागदाेपत्री सूचना नाही
राज्य शिक्षण विभागाने दहावीची परीक्षा रद्दची कोणतीच कागदाेपत्री सूचना किंवा निर्देश जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे परीक्षा घ्यायची की नाही याबाबत ते स्वतः संभ्रामत आहेत, याचा अंदाज येतो. परीक्षा रद्दच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाविरोधात येत्या काही दिवसांत आम्ही याचिका दाखल करण्याची प्रक्रिया करीतच आहोत. दरम्यान, विद्यर्थी, पालकांमधील संभ्रम, तणाव दूर करण्यासाठी तरी शिक्षण विभागाने आपली भूमिका स्पष्ट मांडावी आणि त्यांना गोंधळातून मुक्त करावे.
- धनंजय कुलकर्णी,
अभ्यासक, शिक्षण क्षेत्र
.............................