मुंबई : जिल्ह्यात अनेक मतदारांकडे अद्यापही ब्लॅक अँड व्हाइट मतदान ओळखपत्रे आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने ज्यांना रंगीत ओळखपत्रे हवी आहेत, त्यांना ती दिली आहेत. त्यानुसार आतापर्यंत मुंबईत ५५ लाख मतदारांना रंगीत ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
मतदानासाठी कोणते ओळखपत्र आवश्यक?
मतदार ओळखपत्र हे अधिकृत दस्तऐवज असून, ते मतदान करण्यासाठी वापरले जाते. मतदार ओळखपत्राला आधार म्हणून आधार कार्ड, शासकीय ओळखपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ईपी चिठ्ठी आदी पुरावे ग्राह्य धरले जातात.
मुंबई जिल्ह्यात १३ हजार तरुण मतदार असून, सर्व नवमतदारांना रंगीत कार्ड देण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्यापेक्षा मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रंगीत कार्ड म्हणजे जवळपास २४ हजार रंगीत कार्डधारक मतदार आहेत. एकूण ९६ लाख मतदार, मुंबईत एकूण ९६ लाख मतदार आहेत. त्यापैकी सरासरी ३५ लाख मतदारांकडे जुनेच ब्लॅक अँड व्हाइट मतदान ओळखपत्रे आहेत.
ऑनलाइन अर्ज करा :
१) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी घराच्या पत्त्याचा पुरावा, वय व जन्मतारखेचा पुरावा, फोटो सोबत ठेवा.
२) नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करा.
३) रजिस्ट्रेशन नंतरच्या पेजवरील फॉर्म ६ भरा. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट करा.
४) त्यानंतर काही दिवसांनी तुमचे रंगीत मतदार ओळखपत्र तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येते.
५५ लाख मतदारांकडे रंगीत कार्ड
निवडणूक आयोगाने रंगीत मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केलेल्या जवळपास ५५ लाख मतदारांना ते कार्ड दिले आहे. तर, अजून काही मतदारांना नवीन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.