मुंबई : मंत्रालयातील उंदीर प्रकरण गाजत असतानाच, दारातील मेलेला उंदीर उचलला नाही म्हणून शेजारच्यांकडून एका ४५ वर्षीय इसमाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची घटना कुरारमध्ये घडली. सुभाषचंद्र नंदलाल यादव (४५) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
कांदिवली पूर्वेकडील परिसरात सुभाषचंद्र नंदलाल यादव हे कुटुंबियांसोबत राहतात. ते बिगारी काम करतात. २४ मार्च रोजी ते घरात जेवण होते. त्याच दरम्यान शेजारील अन्सारीने घरासमोर उंदीर मरुन पडल्याचे सांगितले. जेवण झाल्यानंतर उंदीर लांब फेकून देतो असे सांगताच, अन्सारी निघून गेला. थोड्या वेळाने आणखीन एक महिला तेथे आली. तिने तो उंदीर लवकरात लवकर फेकण्यास सांगितले. मात्र करतो सांगत यादवने त्याकडे दुर्लक्ष केले. थोड्याच वेळात चंदन गौड (२२), गनेंद्र गौड (२२) व मुकेश गौड (२०) तेथे आले. त्यांनी त्याच्या गळ्याला पकडून उंदिर उचलण्यास सांगितले. आणि रागाच्या भरात घरातून आणलेल्या लोखंडी सळई, रॉडने मारहाण सुरु केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला उंदिराशेजारीच रक्ताच्या थारोळ्यात सोडून शेजारचे निघून गेले.
ही बाब त्याच्या मुलाला समजताच त्याने यादवकडे धाव घेतली. यादवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी मिळताच कुरार पोलीस तेथे दाखल झाले. याप्रकरणी कुरार पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती कुरार पोलिसांनी दिली