कोरोनाशी लढताना २२७ नगरसेवकांनी मुंबईकरांच्या गरजा लक्षात घेत निधी खर्च करावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 06:40 PM2020-04-28T18:40:26+5:302020-04-28T18:42:09+5:30
मुंबईतल्या २२७ नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या लक्षात घ्याव्यात
मुंबई : कोरोनाशी दोन हात करताना मुंबईतल्या २२७ नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील लोकांच्या समस्या लक्षात घ्याव्यात. त्यांच्याकडून समस्या सोडविण्यासाठी सुचना, हरकती मागवाव्यात. नागरिकांशी संवाद साधावा. नागरिकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. प्रभागमधील रहिवाशांकडून सूचना मागवून नगरसेवकांनी त्यानुसार खर्च करावा. प्रभागमध्ये एरिया सभा घेऊन सदर खर्चाचे पब्लिक आॅडिट व्हावे, असे केले तर कोरोनावर आपण आणखी चांगल्या पध्दतीने नियंत्रण मिळवू शकू; असा आशावाद मुंबई शहर आणि उपनगरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कोविड-१९ च्या उपाययोजना करिता खर्च होत असलेल्या नगरसेवक निधीची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी मुंबईतील विविध १५ सामाजिक संस्थांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केल्याचे सद्वभाना संघाच्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. नगरसेवक निधीमधून कोविड- १९ च्या उपाययोजना करिता १० लाखापर्यंतचा खर्च करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नगरसेवकाचे नाव, प्रभाग क्रमांक, खर्चाचा तपशील आणि एकूण खर्च ही माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी.
नगरसेवक निधीमधून कोविड- १९ च्या उपाययोजना करिता १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. हा खर्च आणि कामावर कार्यकारी आरोग्य अधिका-यांचे नियंत्रण असणार आहे. शिवाय खरेदी ही मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत निर्गमित केलेल्या दरपत्रिकेनुसार केली जाणार आहे. या कारणात्सव मुंबईतील सर्व २२७ नगरसेवक आणि ५ स्वीकृत नगरसेवक यांनी केलेली मागणी, केलेला खर्च हा नगरसेवक नाव, प्रभाग क्रमांक, खर्चाचा तपशील आणि एकूण खर्च ही माहिती सर्वसामान्यांना मिळावी हा यामागचा हेतू असल्याचे मागणी केलेल्या सामाजिका कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. जेणेकरुन सामान्य मुंबईकरांना अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. हा खर्च कसा करावा व त्यामध्ये पारदर्शकता कशी निर्माण होऊ शकेल याकरिता काही सूचनादेखील करण्यात आल्या आहेत, असेही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.