मनीचा दीप जागवताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:53 AM2017-10-15T03:53:01+5:302017-10-15T03:53:04+5:30

बाहेरची स्थिती कशीही असली, तरी आहे त्या स्थितीत दिवाळी साजरी करण्याचा आनंद आपण लुटतोच. येत्या आठवड्यात वाड्यापासून पाड्यापर्यंत आणि चाळीपासून टॉवरपर्यंत सारी घरे अशी दीपावलीच्या स्वागताने उजळून निघतील, अशा आनंददायी दीपोत्सवात मनाचा दिवाही जागवायला हवा.

While lighting a candle lamp ... | मनीचा दीप जागवताना...

मनीचा दीप जागवताना...

googlenewsNext

- विनायक पात्रुडकर

बाहेरची स्थिती कशीही असली, तरी आहे त्या स्थितीत दिवाळी साजरी करण्याचा आनंद आपण लुटतोच. येत्या आठवड्यात वाड्यापासून पाड्यापर्यंत आणि चाळीपासून टॉवरपर्यंत सारी घरे अशी दीपावलीच्या स्वागताने उजळून निघतील, अशा आनंददायी दीपोत्सवात मनाचा दिवाही जागवायला हवा.

जगात कुठेही दिव्यांचा उत्सव साजरा होत नाही. आपण मात्र सूर्याला अर्ध्य देण्यापासूनच दिवसाची सुरुवात करतो. अग्निपूजा हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दिव्याकडे नुसतं पाहिलं तरी मनात उजाळून येतं. मंद समईची शांतपणे जळणारी वातही मनाच्या गाभाºयात अध्यात्माचा ओलावा निर्माण करते. निराशेच्या गर्तेत आशेची एक छोटी ज्योतही जगण्याची पाऊलवाट दाखविते. आशेची एक ज्योत मनातील निराशेचे मळभ झटकून टाकते. या ज्योतीचे महत्त्व वर्षानुवर्षे आपण जाणतो आहोतच. तरीही अंधश्रद्धेत, कर्मकांडात खितपत पडलेली मनोवृत्ती पाहिली की जाणवते, इथे शेकडो ज्योतींची गरज आहे.
स्वत:तील प्रकाश ज्यांनी पाहिला किंवा जाणवला, त्यांनी तर यशाचा इतिहास रचला. स्वत:चा ‘स्पार्क’ स्वत:च ओळखण्याची गरज असते. त्याची शिकवणी समाजधुरीण देत असतात. गेली कित्येक शतके मनाचा अंधकार दूर व्हावा, म्हणून शेकडो संत-महंतांनी प्रयास केले. काहीसे यशही त्यांना मिळाले. तरीही आपल्यापैकी अनेक जण अंधश्रद्धेची झापडे डोळ्यापुढे ओढून बुवाबाजीच्या नादाला लागलेली दिसतात. ज्याच्यावर श्रद्धा टाकावी, तो बाबा आता तुरुंगाची हवा खाताना दिसतो आहे. तरीही बुवाबाजीला आळा बसताना दिसत नाही. स्वत:तला प्रकाश शोधण्यासाठी जेव्हा हजारो माणसे अशा बुवांकडे जातात, तेव्हा आपली सारासार बुद्धी गहाण ठेवतात. फसवणुकीचा, विश्वासघाताचा अनुभव घेतात, तरीही त्यांच्यावरची श्रद्धा सोडत नाहीत. त्यांना खरोखर सलाम ठोकला पाहिजे. अक्कल गहाण ठेवून आलेल्या लोकांना या बुवा-बाबांनी नागवले आहे, हे आजवरचे सत्य आहे. तरीही निर्बुद्धपणे आपण पुन:पुन्हा तोच गुन्हा करत असतो. खरं तर आजच्या डिजिटल युगात ज्ञानाचा दिवा सर्वत्र तेवत असताना, बुद्धिमंतांची दिवाळी घरोघरी साजरी व्हायला हवी; पण हे चित्र दिसत नाही. बुद्धीच्या तेजाचा स्पर्श होताच ही मंडळी परदेशात स्थायिक होतात आणि इथला अंधार तसाच राहून जातो. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाचा दिवा पोहोचविण्याची गरज आहे. तो शिक्षणाच्या रूपाने अधिक वेगाने जाऊ शकतो.
एकीकडे मंगळावर स्वारी करण्यापर्यंत विज्ञानाने मजल मारली असताना, दुसरीकडे पत्रिकेतल्या मंगळावरून लग्न मोडण्याची परंपरा कायम आहे. विचारांची ही दरी कमी होण्याची गरज आहे. संवादातून ज्ञानाचा नक्कीच प्रचार आणि प्रसार होतो, म्हणूनच आपल्याकडे प्रवचन, भजन, कीर्तन, निरुपण, व्याख्याने आदी परंपरा आहेत. त्यातूनच ज्ञानाची दिवाळी साजरी करण्याची आपली परंपरा आहे. दरवर्षी जरी दिवाळी साजरी होत असली तरी प्रत्येकाच्या आयुष्यात एखाद्या टप्प्यावर प्रतिभेचा, ज्ञानाचा स्पर्श होतोच. तो जाणून त्याच्या प्रकाशमय मार्गाने वाटचालीची कास धरली, तर आयुष्य निश्चित उजळून निघते, असा संदेश यापूर्वी अनेक दिव्यानुभूती घेतलेल्या संतांनी दिलेला आहे. प्रश्न आहे तो जागरूक राहण्याचा, दक्ष असण्याचा. आपणच आपल्या मनातल्या प्रकाशाकडे डोळसपणे पाहू शकलो, तर रोजचाच दिवस जणू दिवाळीचा बनून जाईल. बाहेरच्या दिव्यांची पूजा करताना कधी तरी मनातल्या अंधाराकडे डोकावून पाहिले तरी तो अंधार हळूहळू दूर होताना दिसेल; पण आत डोकावण्याची गरज आहे. येणाºया दिवाळीत असा विचार करून आपण ज्ञानाची दिवाळी साजरी करू शकतो.
दिवाळी सण तर परंपरेने आलेला असला तरी त्यामागची भावना नव्या तºहेने, दिशेने समजावून घेण्याची गरज आहे. बाहेरचा दिवा पूजताना अंतरात्म्याचा दिवा कसा सातत्याने तेजाळत राहील, याकडे पाहण्याची गरज आहे. ती पाहण्याची वृत्ती एकदा का विकसित झाली की, ज्ञानाची दिवाळी साजरी झालीच म्हणून समजा.

Web Title: While lighting a candle lamp ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी