मुंबई: आज मुंबईत 3775 कोरोना रुग्ण सापडले.गेल्या काही महिन्यातील ही सर्वात जास्त कोरोनाची रुग्ण संख्या आहे. एकीकडे मुंबईत विशेष करून पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना पालिका प्रशासनाने पूवी प्रमाणे कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून गांभीर्य दाखवावे असे मत माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
पश्चिम उपनगरात कोरोनाच्या रुग्णांची इमारत सॅनिटाईझ केली जात नाही. येथे कोरोना रुग्ण आहेत असा बोर्ड देखिल लावला नाही. तर कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबाशी संपर्क सुद्धा केला नाही. कोरोना बाधित रुग्णांच्या चाचण्या देखील होत नाही, त्यांच्याशी पालिका अधिकारी संपर्क सुद्धा साधत नाही. तर कोरोना बाधित रुग्णांचे कुटुंबिय क्वारंटाईन होण्याच्या ऐवजी बाहेर सर्रास फिरत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती त्यांनी दिली
पश्चिम उपनगरातील एच पश्चिम,के पूर्व,के पश्चिम या वॉर्डला त्यांनी नुकतीच डॉ.दीपक सावंत यांनी भेट दिली होती. या वॉर्ड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिका प्रशासनाने वाढत्या कोरोनाकडे पूर्वी प्रमाणे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे,अन्यथा कोरोनाचा स्फोट होऊन रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे मुश्किल होईल अशी भीती त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.