नितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 04:54 PM2021-07-31T16:54:39+5:302021-07-31T16:58:32+5:30
नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.
नागपूर - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक होत नाही, असं घडणारच नाही. राज्यातील कित्येक उड्डाण पूल आणि महामार्ग बांधण्याचं श्रेय त्यांनाच जातं. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गही त्यांच्याच पुढाकाराने झाला. त्यामुळेच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना रोडकरी असं नाव दिलं होतं. बाळासाहेबांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गज नेते नितीन गडकरींचं कौतुक करतात. आता, भाजपापासून फारकत झालेले शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही गडकरींचं तोंड भरुन कौतुक केलं.
नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभावाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. तसेच, युती सरकारच्या काळातील आणि युतीमध्ये एकत्र असतानाच्या आठवणही जागवल्या.
“नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण, मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं. तुम्ही ही शहरं जोडली. या दोन शहरांमध्ये जाण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागायचा. पण, आता 2 तासांत या शहरातील नागरिकांना पोहचता येतं. आता, या शहरांचं अंतर कमी करून तुम्ही ती शहरं अजून जवळ आणत आहात”, असं ते म्हणाले.
नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा - LIVE https://t.co/szmQlyDc3q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2021
“स्वप्न पाहायलाही धाडस लागतं आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठं धाडस लागतं. तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता, तर म्हटला असता बघतो मी जरा, कसं शक्य आहे, काय होऊ शकतं, कसं होईल. पण तुम्ही तात्काळ सांगितलं मी करतो आणि करून दाखवलंत. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. तुमची पुढची वाटचाल आत्ता तुम्ही ज्या गतीने करता आहात, त्याच गतीने व्हावी, अशा मी शुभेच्छा देतो”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या सोहळ्याला मुंबईतूनच व्हिडिओ कॉन्फरेन्सींगद्वारे मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. तर, गडकरी नागपूरात कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.