नागपूर - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक होत नाही, असं घडणारच नाही. राज्यातील कित्येक उड्डाण पूल आणि महामार्ग बांधण्याचं श्रेय त्यांनाच जातं. मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गही त्यांच्याच पुढाकाराने झाला. त्यामुळेच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना रोडकरी असं नाव दिलं होतं. बाळासाहेबांपासून ते शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गज नेते नितीन गडकरींचं कौतुक करतात. आता, भाजपापासून फारकत झालेले शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही गडकरींचं तोंड भरुन कौतुक केलं.
नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या कामाचं आणि त्यांच्या स्वभावाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं. तसेच, युती सरकारच्या काळातील आणि युतीमध्ये एकत्र असतानाच्या आठवणही जागवल्या.
“नितीनजी, मी उगीच तुमचं कौतुक करत नाही. पण, मला ते दिवस आठवतात, जेव्हा आपलं युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरं. तुम्ही ही शहरं जोडली. या दोन शहरांमध्ये जाण्यासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी लागायचा. पण, आता 2 तासांत या शहरातील नागरिकांना पोहचता येतं. आता, या शहरांचं अंतर कमी करून तुम्ही ती शहरं अजून जवळ आणत आहात”, असं ते म्हणाले.