अंबरनाथ : अंबरनाथमधील नगरपालिकेच्या खुंटवली बहुभाषिक शाळेत दुपारचे सत्र सुरू असतानाच याच शाळेच्या मैदानावर सायंकाळच्या लग्न समारंभाची जोरदार तयारी सुरू होती. शाळेचे मैदान लग्न समारंभाला दिल्याने त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या खुंटवली परिसरात अंबरनाथ नगरपालिकेची बहुभाषिक शाळा आहे. या शाळेत सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेबाहेर असलेले पटांगण याच भागातील एका रहिवाशाने लग्न समारंभासाठी पालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन भाड्याने घेतले होते. हा कार्यक्रम सायंकाळचा असल्याने तोपर्यंत शाळेतील विद्यार्थी घरी जातील, अशा अंदाजाने पालिकेने त्यांना परवानगी दिली होती. मात्र, लग्न समारंभ असल्याने सकाळपासूनच मंडप आणि जेवणाची तयारी सुरू झाली होती. एकीकडे वर्ग सुरू असताना शाळेच्या या मैदानावर लग्न समारंभाची तयारी सुरू होती. हा प्रकार नेहमीच घडत असल्याने पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. शाळा सुटण्याआधीच येथे सुरू असलेल्या स्वयंपाकाची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेले स्थानिक नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी हा प्रकार पाहून शिक्षण समिती सभापती विजय पवार, पालिकेचे उपमुख्याधिकारी जितेंद्र गोसावी आणि बाजार विभागाचे प्रभारी श्रीकांत निकुळे यांना घटनास्थळी बोलवून घेतले आणि परिस्थितीची माहिती दिली. या प्रकारानंतर पालिका प्रशासनाने आपली चूक कबूल केली असून यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची दखल घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शाळा सुरू असतानाच लग्नाची ही तयारी?
By admin | Published: January 03, 2015 11:45 PM