मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिल्यानंतर, वंचितचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. वंचितमधून बाहेर पडणाऱ्या पडळकरांविषयी वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये राग पाहायला मिळत आहे. जालन्यातील जय भीम सेना संघटनेने, गोपीचंद पडळकर यांना जोड्यांनी मारा आणि 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळवा असे बॅनर लावले आहेत. पडळकरांना जो कोणी जोड्याने मारेल त्या व्यक्तीला भीम सेनेने 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. जालना येथे पडळकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
‘गोपीचंद पडळकर धनगर समाजाशी गद्दारी करू नका, कारण तुम्ही सांगितलं होतं, धनगरांना जोपर्यंत एसटी’ प्रवर्गाचे आरक्षण आणि दाखला हातात मिळत नाही, तोपर्यंत भाजप नेत्याचा तोंड सुद्धा बघणार नाही, असे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी यापूर्वी म्हटले होते. जर भाजपा पदाधिकाऱ्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावणार नाही मग पद व सत्तेसाठी आता गद्दारी का…? असंही शिंदे यांनी म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण आजपासून वंचितचे काम थांबवणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची अंतिम यादी पडळकर यांनी केली होती.