मुंबई-
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेचे जवळपास ४० हून अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर अनेक माजी आमदार, नगरसेवक आणि विभागप्रमुख देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष आपल्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या बंडाला समोरं जात असताना शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे स्थानिक पातळीवर शिवसेनेची मोट बांधू लागले आहेत. पक्षाला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे स्वत: 'ऑन फिल्ड' उतरले असून ते पक्षाच्या जिल्हाधिकारी आणि विभागप्रमुखांच्या बैठकीसाठी मातोश्रीहून रवाना झाले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES येथे क्लिक करा
मुंबईत शिवसेना भवनावर आज शिवसेना पदाधिकारी, जिल्हाधिकारी, विभाग प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात पक्षाचे महत्वाचे नेते पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असल्यामुळे ते या कठिण प्रसंगात थेट शिवसैनिकांशी भेटू शकत नसले तरी आदित्य ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारुन पक्षाच्या एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे शिवसेना भवनाच्या दिशेने रवाना झाले असून ते शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. तसंच उद्धव ठाकरे यांची भूमिका सर्वांसमोर मांडणार आहेत.
शिवसेनाच्या पक्षात उभी फूट पडत असताना स्थानिक पातळीवर शिवसैनिकांची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी नेत्यांनी आता जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात ठिकठिकाणी बंडखोरीचा निषेध शिवसैनिक व्यक्त करताना दिसत आहेत. तसंच संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याची गरज लक्षात घेऊन आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत.
वज्रमूठ दाखवून स्पष्ट केले इरादेमुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मातोश्रीवर दाखल होतानाही उपस्थित शिवसैनिकांना अभिवादन करत आदित्य ठाकरेंनी वज्रमूठ दाखवून आपण खंभीरपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभं असल्याचं दाखवून दिलं होतं. तसंच त्यांनी माध्यमांशी बोलणंही टाळलं आहे. सध्या शिवसैनिकांशी संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याचा आदित्य ठाकरे प्रयत्न करत आहेत. आजही शिवसेना भवनाकडे रवाना होताना आदित्य ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना वज्रमूठ दाखवून त्यांचं मनोबल उंचावलं.