राज्य थंडीने गारठत असताना मुंबईकर मात्र थंडीच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 04:12 AM2019-11-17T04:12:47+5:302019-11-17T06:30:45+5:30
बहुतांश शहरांतील तापमान घसरले; उस्मानाबाद १४.४; तर मुंबईचा पारा २३.८ अंशांवर
मुंबई : मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शहरांचे किमान तापमान बऱ्यापैकी खाली घसरले असून, यामध्ये खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शहरांचा समावेश आहे. शनिवारी मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले असून, हे राज्यातील सर्वाधिक कमी तापमान आहे, तर दुसरीकडे मुंबई अद्यापही थंडीच्या प्रतीक्षेत असून, शनिवारी मुंबईचे किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. परिणामी, राज्य थंडीने गारठत असले, तरी मुंबईकर मात्र थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण, गोव्याच्या उर्वरित भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात रविवारसह सोमवारी आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २३ अंशाच्या आसपास राहील.
मुंबईही गारठणार, पण...
गेल्या आठवड्याभरापासून मुंबईचे किमान तापमान २३ ते २४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. मुंबईकरांना प्रत्यक्षात थंडीचा अनुभव मिळावा, म्हणून किमान तापमानात आणखी ८ अंशाची घसरण होण्याची गरज आहे. जेव्हा मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात येईल; तेव्हा कुठे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येईल.
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये...
उस्मानाबाद १४.४
परभणी १६.८
जळगाव १७.६
नाशिक १८.३
पुणे १८.४
सातारा १९.४
बारामती १९.८
माथेरान २१
सांगली २१.१
कोल्हापूर २१.५
सोलापूर २२.५
रत्नागिरी २३.६
डहाणू २४.२
अलिबाग २४.४
मुंबई : कमाल ३४.६ । किमान २३.८