Join us

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 12:43 PM

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या घोषणेला अवघे काही दिवसच उरले असून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. तर, कायम चर्चेत असलेल्या बारामती मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार असाच सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात आता प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घोषणाच केली आहे. 

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमदेवारीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असताना काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत होतं. तर, आता थेट सुनिल तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणाच केली आहे. मात्र, जर ही जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला सुटली तरच हे नाव निश्चित असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केले. 

''अद्याप महायुतीचं जागावाटप झालं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की, महायुतीच्या जागावाटपात बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी. जर महायुतीमध्ये बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढणार असल्याचं निश्चित झालं, तर आज मी या ठिकाणी दावा करू शकतो की, सुनेत्रावहिनी पवारच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील,'' असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.  

चित्रा वाघ यांनीही केलं होतं विधान

बारामतीमधील लोकसभा जागेच्या चर्चेसंदर्भात यापूर्वी चित्रा वाघ यांनीही विधान केलं होतं. "बारामती लोकसभा मतदारसंघातून यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे," असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. लोणावळ्यात "रन फॉर नेशन, रन फॉर मोदी" मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी वाघ यांनी हे वक्तव्य केलं होतं. सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळेच चित्रा वाघ यांनी पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होत होती. आता, तटकरे यांनी एकप्रकारे या उमेदवारीच्या वृत्ताला दुजोराच दिलाय.

टॅग्स :सुप्रिया सुळेअजित पवारसुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेस