... तर छगन भुजबळांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 12:34 PM2024-02-12T12:34:46+5:302024-02-12T12:35:11+5:30
सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपला विरोध असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट करत एल्गार पुकारला आहे. तर, सरकारनेही मराठा आरक्षणासाठी १६ फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावलं असून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसींच्या नेत्यांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या या प्रश्नावरुन आक्रमक झाल्याचं दिसून येते. त्यातच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकत नोंदवण्यात येत आहे. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. ओबीसी नेत्यांनी एकजुट करुन पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलं आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते आहेत. वंचित बहुजन आघाडी सध्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहे.
ओबीसी नेत्यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांचा सल्ला घेतला. ओबीसी पक्ष काढता आहेत ही फार चांगली गोष्ट आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, छगन भुजबळ यांनी या ओबीसी संघटनेचे नेतृत्व करावे. पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी त्यांना सामाजिक व राजकीय मदत करायला तयार आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची केली होती मागणी
छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. छगन भुजबळ राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी उपस्थित केला होता. एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं. छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. मात्र, भुजबळ यांनी राजीनामा यापूर्वीच दिल्याचं जाहीर केलं. त्यामुळे, आता प्रकाश आंबेडकरांनीही ओबीसी पक्षाच्या नेतृत्वासाठी भुजबळ यांना साद घातली आहे.