मुंबई - लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नाव सध्या महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात चांगलंच चर्चेत आहे. मात्र, आता हे नाव जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निघाले तेव्हा पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार चांगलेच संतापले. यावेळी, त्यांनी पदाधिकाऱ्यांना दमही भरला. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला राष्ट्रवादी पक्षात बंदी घालण्यात येणार आहे. राज्यभरात कुठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या सूचनाच यावेळी अजित पवारांनी केल्या आहेत.
राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली. त्यावर, अजित पवार यांनी संताप व्यक्त करत पदाधिकाऱ्यांना दमच भरला.
महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. आपल्या वडिलधाऱ्यांनी पहिल्यापासूनच एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. त्यामुळेच, लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सचा प्रकार घडत असल्यासे तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन, असे मत अजित पवार यांनी बैठकीत मांडले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू
हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथं चालणारे लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांत अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू, अशा शब्दात अजित पवार यांनी राज्यातील इतर राजकीय पक्षांना किंवा संघटनांनाही इशारा दिला आहे.