मुंबई : मुंबईसह राज्यभरातील हवामान आता किंचित का होईना स्थिर होत असतानाच पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत आहेत. त्यानुसार, ३० आणि ३१ मार्चसह १ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतही किंचित ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी मुंबईत किंचित ढगाळ वातावरणाची नोंद झाली.
मराठवाडा वगळता मुंबईसह कोकणातील ४ जिल्हे व विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया व वाशीम ते गडचिरोली जिल्ह्यात तसेच खान्देश, नाशिक ते कोल्हापूर, सांगली, सोलापूरपर्यंत ३० व ३१ मार्च असे दोन दिवस वातावरण ढगाळ राहील. काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. विदर्भात त्यापुढे आणखी दोन दिवस वातावरणाची तीव्रता जाणवू शकते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत मात्र स्वच्छ व कोरडे वातावरण असेल, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.
बर्फवृष्टीची शक्यता
वैष्णोदेवी, काश्मीर व्हॅली, बद्रीनाथ केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, शिमला, कुलू मनाली, देहाराडून थेट अमृतसर व सभोवतालचा परिसरात ३० मार्चपासून ३ दिवस पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे.