Join us  

विमान प्रवास करताय, मग मोबाइलमध्ये डिजियात्रा हवेच; ॲप कसे वापरायचे? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 10:03 AM

गेल्या दीड वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून, वाढत्या गर्दीमुळे विमानतळावर प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून, वाढत्या गर्दीमुळे विमानतळावर प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागत आहेत. साहजिकच विमानतळात प्रवेश करण्यासाठी विलंब होत असल्याने दुसरीकडे त्याचा फटका विमानांच्या वेळापत्रकावर होत आहे. 

परिणामी अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब होण्याच्या घटनांत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर डिजियात्रा हे नवे ॲप प्रवाशांना होणारा विलंब टाळण्यास मोलाची भूमिका बजावताना दिसत आहे.  गेल्या दहा वर्षांत देशात ७५ नवीन विमानतळांची निर्मिती झाल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

विमानतळावर प्रवेशाला विलंब-

१) या पार्श्वभूमीवर अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांनीदेखील वेगवेगळ्या योजना सादर केल्या आहेत. यामुळे विमानतळावरील गर्दीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र आहे.

२) दरम्यान, एखादा प्रवासी जेव्हा विमानतळावर येतो, तेव्हा सर्वप्रथम विमानतळाच्या प्रवेशद्वारावर त्याचे तिकीट, वेब चेक-इन, बोर्डिंग पास आणि सरकारी ओळखपत्र तपासून त्याला आत सोडले जाते.

३) देशातील बहुतांश विमानतळांवर विमान कंपन्यांना त्यांची प्रवेशद्वारे निश्चित करून देण्यात आली आहेत. मात्र, एखादी विमान कंपनी एकाच वेळी किंवा एकाच सुमारास विविध विमाने उड्डाण करणार असल्याने त्यांच्या प्रवेशद्वारावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर रांग लागते. काही वेळा याचा फटका विमानाला विलंब होण्याच्या रूपाने देखील बसतो. 

१३ ठिकाणी झाली चाचणी-

१) या पार्श्वभूमीवर नागरी विमान मंत्रालयाने गेल्या वर्षी डिजियात्रा ॲप सादर केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यांत देशातील १३ प्रमुख विमानतळांवर याची चाचणी घेण्यात आली. 

२) ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता देशातील अनेक विमानतळावर याचा विस्तार होत आहे. 

ॲप कसे वापरायचे?

१) मोबाइलमध्ये हे ॲप डाउनलोड करावे लागते.

२) त्यामध्ये आपल्या सरकारी ओळखपत्राचा फोटो अपलोड करावा लागतो.

३) त्यानंतर ओटीपी येऊन त्याची पडताळणी होते. 

४) या पायरीनंतर आपल्याला आपला फोटो अपलोड करावा लागतो.

५) एकदा सर्व पडताळणी झाली की हे ॲप वापरता येते.

६) विमान प्रवासापूर्वी तुम्ही या ॲपमध्ये तुमचा बोर्डिंग पास अपलोड करा.

७) डिजियात्रा ॲपसाठी विमानतळावर टॅबलेट कॉम्प्युटर उपलब्ध आहेत.

८) या कॉम्प्युटरला जोडलेल्या स्कॅनरवर आपला बोर्डिंग पास स्कॅन करावा.

९) त्यानंतर या कॉम्प्युटरवर आपला चेहरा स्कॅन केला जातो.

१०) चेहरा स्कॅन होऊन पडताळणी झाली की तुम्ही थेट विमानतळात प्रवेश करू शकता.

टॅग्स :मुंबईविमान