मुंबई - हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधान भवनाकडून होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रामुख्याने सहभाग होता. विधिमंडळाच्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे हे विधान भवनात दाखल झाले. तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाच्या गेटवर आले होते. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणावेळी ठाकरे कुटुंबातील कोण उपस्थित राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या कार्यक्रमासाठी राज्यातील केंद्रात असणारे मंत्री, राज्याचे मंत्री, आमदार, खासदार यांना आमंत्रण दिले आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेले कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर हजर असतील. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांना आमंत्रण दिले आहे. मी स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि इतर सदस्यांशी बोललो आहे. हा कार्यक्रम विधिमंडळाकडून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित सर्वांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरेंना विधिमंडळातर्फे मानवंदना राहावी असं आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले होते.
उद्धव-आदित्य ठाकरे गैरहजर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातील प्रमुख पाहुणे हजर राहतील असं सांगण्यात आले. परंतु या कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याचं आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का असा सवाल निर्माण झाला होता. परंतु कार्यक्रमाला काही मिनिटे शिल्लक आहेत त्यात अद्यापही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कार्यक्रमाला आले नसल्याने ते इथे गैरहजेरी लावणार असं मानलं जात आहे.