Mumbai High Court, Whistle: गच्चीतून शिट्टी वाजवली तर तरुणीची छेड काढली होते का? हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 02:33 PM2023-01-26T14:33:52+5:302023-01-26T14:35:19+5:30
तीन तरूणांवर दाखल करण्यात आला होता अत्याचाराचा गुन्हा
Whistling from terrace, sexual assault: गच्चीवरून शिट्टी वाजवून तरूणीची छेड काढली असा आरोप केल्याप्रकरणी ३ आरोपींना सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठाने या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातून किंवा गच्चीवरून आवाज दिल्याने, शिट्टी वाजवल्याने ती कृती थेट तरूणीची छेडछाड म्हणू शकत नाही. एखाद्या व्यक्तीने त्याच्या घरातून एखादा आवाज केला (शिट्टी वाजवणे) तर त्या संबंधित व्यक्तीने त्या तरूणीची छेड काढण्याच्या उद्देशाने तसे केले असा थेट निष्कर्ष काढणे शक्य नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.
शिट्टी वाजवणे लैंगिक छळ/ विनयभंग नाही: मुंबई उच्च न्यायालय
शिट्टी वाजवल्यामुळे शेजाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती अभय वाघसे यांच्या खंडपीठाने त्यांच्या टिप्पणीत म्हटले आहे की, जर एखाद्या पुरुषाने शिट्टी वाजवली तर त्याचा हेतू महिलेची छेड काढणे असा होतो असे म्हणता येणार नाही, अशी माहिती टीओआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपींबद्दल अधिक माहिती म्हणजे, अहमदनगरमधील लक्ष्मण, योगेश आणि सविता पांडव या तीन तरुणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा म्हणजेच एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने तिघांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या आदेशाविरोधात तिन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्या दिवशी नक्की काय झाले?
पोलिसांत दाखल केलेल्या FIR नुसार, सर्व आरोपी आणि पीडिता शेजारी राहतात. योगेश तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत असल्याचा आरोप पीडितेने केला. सुरुवातीला तिने योगेशकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्याचे तो सांगतो. पण २८ नोव्हेंबरला योगेशने तिचा व्हिडीओ त्याच्या घरातून बनवला, असे पीडितेने सांगितले. तसेच, तिच्या पतीने योगेशच्या घरमालकाकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही. यानंतर योगेशची हिंमत वाढल्याने त्याने तरूणीबाबत जातीवाचक शिवीगाळ केली. योगेश मोबाईलवरून काढलेले माझे फोटो इतरांना दाखवत होता. 'असे प्रकार थांबव' असे सांगूनही असं वागणं थांबवलं नाही, असा आरोपही त्या तरूणीने केला. तसेच शिट्टी वाजवण्याच्या प्रकरणीही तिने आरोप केले होते.