Join us

पांढऱ्या रक्तपेशीतील घटक करणार वेगळे

By admin | Published: January 03, 2016 3:37 AM

रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास रुग्णाला पांढऱ्या रक्तपेशींमधील ग्रॅन्युलोसीट घटक दिला जातो. पांढऱ्या रक्तपेशीतून हा घटक वेगळा करण्याची प्रक्रिया खासगी रक्तपेढ्यांमध्ये

मुंबई: रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास रुग्णाला पांढऱ्या रक्तपेशींमधील ग्रॅन्युलोसीट घटक दिला जातो. पांढऱ्या रक्तपेशीतून हा घटक वेगळा करण्याची प्रक्रिया खासगी रक्तपेढ्यांमध्ये केली जाते. तथापि, राज्यात प्रथमच पालिकेच्या केईएम रुग्णालयात ही प्रक्रिया २ जानेवारी रोजी करण्यात आल्याची माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. प्लॅस्टिक अ‍ॅनिमिया असणारे रुग्ण, मणक्याचा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये पांढऱ्या रक्तपेशी तयार होण्याचे प्रमाण कमी असते. कर्करोगाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये किमो थेरपीमुळे पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. त्यामुळे या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास संसर्ग होऊन आजार बळावण्याचा धोका असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी काहींना पांढऱ्या रक्तपेशी द्याव्या लागतात, असे डॉक्टरांनी सांगितले. पांढऱ्या रक्तपेशींमधील एक महत्त्वाचा घटक गॅ्रन्युलोसीट हा असतो. या घटकामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, पण राज्यातील शासकीय अथवा महापालिका रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये ही प्रक्रिया व्हायची नाही. खासगी रक्तपेढ्या यासाठी जास्त शुल्क आकारतात. एखाद्या गरजू रुग्णाला महापालिका रुग्णालयात ग्रॅन्युलोसीट हा घटक उपलब्ध व्हायचा नाही, पण आता केईएम रुग्णालयात हा घटक सहज उपलब्ध होणार आहे. कारण केईएमच्या रक्तपेढीत ही प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. हा घटक वेगळा करण्याच्या प्रक्रियेसाठी एफडीएची मान्यता असणे आवश्यक आहे. एफडीएकडून केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना अत्यल्प दरात हा घटक उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. (प्रतिनिधी)