Join us  

सफेद जांभूची फळगळती

By admin | Published: May 27, 2014 1:07 AM

देशभरातून प्रामुख्याने डहाणू तालुक्यात आढळणार्‍या सफेद जांभू या फळाला वाढती उष्णता व हवामान बदलाने फळगळतीचा सामना करावा लागत आहे.

अनिरुध्द पाटील, बोर्डी  - देशभरातून प्रामुख्याने डहाणू तालुक्यात आढळणार्‍या सफेद जांभू या फळाला वाढती उष्णता व हवामान बदलाने फळगळतीचा सामना करावा लागत आहे. फळगळतीमुळे हंगाम संपण्यापूर्वी बाजारातून जांभू गायब होण्याची शक्यता असून आर्थिक संकट ओढवल्याने बागायतदार व विक्रेते हवालदिल झाले आहेत. भारतात सर्वप्रथम चिकू आणि सफेद जांभू या परदेशी फळझाडांची लागवड घोलवड, बोर्डी परिसरात पारसी समुदायाने केली. देशभरात कमी असलेल्या या फळाचे भरघोस उत्पादन डहाणू तालुक्यात घेतले जाते. पालघर, वसई तालुक्यात या फळाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात ऐंशी हेक्टर क्षेत्रावर सफेद जांभूची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली. खत, मजुरी व व्यवस्थापन खर्च वगळता प्रतिनग चाळीस पैसे शेतकर्‍यांना मिळतात. बांबूच्या करंड्यात पॅकिंगनंतर वापी, सुरत, विरार, वाशी, मुंबई बाजारपेठेत प्रतिदिन माल पाठविला जात असल्याची माहिती घोलवड येथील प्रयोगशील शेतकरी जितेंद्र वासुदेव खोत यांनी दिली. दरम्यान, डहाणू तालुक्यात पंधरा दिवसांपासून हवामानात चढ-उतार दिसून आला. उष्म्यात वाढ व ढगाळ वातावरणामुळे जांभूची फळगळती सुरू झाली आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकाची नासाडी होत आहे. वीस-पंचवीस दिवस आधी जांभूचा हंगाम संपण्याची शक्यता वर्तविली जात असून आर्थिक संकट ओढावणार असल्याने शेतकरी व स्थानिक विक्रेते धास्तावले आहेत.