महापालिका मुख्यालयाचा पांढरा हत्ती

By admin | Published: October 25, 2015 12:35 AM2015-10-25T00:35:29+5:302015-10-25T00:35:29+5:30

पामबीच रोडवरील महापालिकेचे मुख्यालय ग्रीन बिल्डिंग असल्याचा दावा केला जात असून, त्याला बांधकामाचे गोल्ड मानांकर मिळाले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वास्तू पांढरा हत्ती ठरू

White elephant of municipal headquarters | महापालिका मुख्यालयाचा पांढरा हत्ती

महापालिका मुख्यालयाचा पांढरा हत्ती

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
पामबीच रोडवरील महापालिकेचे मुख्यालय ग्रीन बिल्डिंग असल्याचा दावा केला जात असून, त्याला बांधकामाचे गोल्ड मानांकर मिळाले आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ही वास्तू पांढरा हत्ती ठरू लागली आहे. उद्घाटन होऊन १ वर्ष ८ महिने झाले तरी अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. कार्यालयांमध्ये सूर्यप्रकाश येत नसल्याने दिवसाही विजेचा वापर करावा लागत आहे. १९ महिन्यांमध्ये तब्बल ५ कोटी रुपये वीजबिल आले असून, प्रत्येक वर्षी देखभालीवरही करोडो रुपये खर्च होत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर भव्य मुख्यालय बांधले आहे. लोकसभेच्या इमारतीप्रमाणे रचना गोल आकार व राष्ट्रपती भवनप्रमाणे इमारतीवर घुमट अशी रचना केली आहे. जवळपास २०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीचे फेब्रुवारी २०१४ मध्ये उद्घाटन करण्यात आले आहे. ग्रीन बिल्डिंग व गोल्ड मानांकनही इमारतीला भेटले आहे. मुख्यालयाच्या समोर २२५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारला आहे. पामबीच रोडवरून जाताना ही इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या इमारतीमुळे शहराच्या लौकिकामध्ये भर पडली असल्याचेही बोलले जाते. बाहेरून इमारत पाहिली की सर्व बिरुदावल्या खऱ्या वाटू लागतात. परंतु प्रत्यक्षात इमारत पाहिली की ही पालिकेची शान नसून तिजोरीवर भुर्दंड असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील काम अद्याप अपूर्ण आहे. या मजल्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. छताला सिलिंग झालेले नाही. मजल्यावर इमारतीचे नियंत्रण करणारा विभाग, पतसंस्था व काही स्टोअर रूम आहेत. सरकारी कार्यालयामध्ये कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असते. परंतु पालिका मुख्यालयामध्ये जास्तीत जास्त जागेचा कमीत कमी वापर केला जात आहे. तळमजला व वरील दोन व तीन मजल्यावर कार्यालय सुरू आहे. चौथ्या मजल्यावर आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते यांची दालने व स्थायी समिती बैठकीचा हॉल आहे. पाचव्या मजल्यावर सभागृह आहे. वरील दोन मजल्योवर प्रसाधनगृहेही नाहीत व पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. १९ महिन्यांत ५ कोटी रुपये वीजबिल आले आहे. वर्षाला देखभालीसाठी ३ कोटी व साफसफाईसाठी १ कोटी खर्च होत आहेत. मुख्यालय हा पांढरा हत्ती झाला असून, तो सांभाळण्यासाठी तिजोरीवरही ताण पडत आहे.

सुरक्षा वाऱ्यावर
मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी कॅमेरे बसविले आहेत. परंतु पालिका मुख्यालय म्हणजे धर्मशाळा झाली आहे. मुख्यालयाच्या बेसमेंटमध्ये वाहनतळ केला आहे. आतमध्ये येणाऱ्या वाहनांची कोणतीही तपासणी केली जात नाही. मुख्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांची बॅगही तपासली जात नाही. सर्वांची नोंदही ठेवली जात नाही. निविदा न काढता कँटीन चालविण्यास दिले असून, कँटीमध्ये इस्टेट एजंट दिवसभर ठाण मांडू लागले आहेत.

ध्वज उतरविला
मुख्यालयासमोर २२५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारला आहे. देशातील सर्वात उंचावरील राष्ट्रध्वजही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. परंतु पावसाळा सुरू झाल्यापासून ध्वज उतरवून ठेवला आहे. पाऊस पडत नसतानाही तो पुन्हा लावलेला नाही. ध्वज फाटण्याच्या घटनाही वारंवार घडत असून, मोकळा स्तंभ पाहून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

विजेची उधळपट्टी
पालिका मुख्यालयामध्ये विजेची उधळपट्टी सुरू आहे. गरज नसताना पूर्ण इमारतीमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे वीजबिल भरमसाठ वाढत आहे. कार्यालयांची रचना चुकली आहे. खिडकीच्या बाजूला अधिकाऱ्यांची दालने असल्यामुळे बाहेरील कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरू असेल तरच काम करता येते. दुपारी जेवण करण्यासाठी गेल्यानंतरही वीज बंद केली जात नाही. विजेचा सर्वाधिक वापर होत असताना ही ग्रीन बिल्डिंग कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बांधकाम अपूर्णच
मे २००९ मध्ये इमारतीचे काम सुरू केले. जवळपास पाच वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर फेब्रुवारी २०१४ मध्ये घाईगडबडीमध्ये इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तीन महिने इमारतीचे काम सुरूच होते. मेअखेरीस प्रत्यक्षात इमारतीचा वापर सुरू झाला. काम सुरू होऊन सहा वर्षे व उद्घाटन होऊन १ वर्ष ८ महिने झाल्यानंतरही अद्याप बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.

पालिका मुख्यालयाचे प्रतिमहिना वीजबिल
महिनावीजबिल
डिसेंबर २०१३७,२३,६१२
जानेवारी २०१४८,६३,८३७
फेब्रुवारी १४१३,६८,६६०
मार्च १४११,४६,१६०
एप्रिल १४३०,३५,५३०
मे १४१३,८४,९६०
जून १४२७,३४,७००
जुलै १४१३,८४,९६०
आॅगस्ट १४२३,३६,३६०
सप्टेंबर १४२४,१४,५७०
आॅक्टोबर १४ २१,२३,७१०
नोव्हेंबर १४२८,६४,४७३
डिसेंबर १४२६,७५,४६०
जानेवारी २०१५२३,७८,७१०
फेब्रुवारी १५२१,२२,३१०
मार्च १५२८,७८,०१०
एप्रिल १५२५,९७,३७०
मे १५२७,२१,७८०
जून १५३२,३१,२१७
एकूण ४,०९,८६,३८९

Web Title: White elephant of municipal headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.