भाडेतत्वावरील बेस्ट बसगाड्या ठरतयेत पांढरा हत्ती; भाजपचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 10:51 PM2021-10-12T22:51:00+5:302021-10-12T22:55:01+5:30
बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ या वर्षात दोन हजार २३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर केला.
मुंबई - बेस्ट उपक्रमाने खासगी ठेकेदारांकडून भाडेतत्वावर घेतलेल्या बसगाड्यांच्या माध्यमातून ४७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र त्यावरील खर्च हा ९७० कोटी रुपये एवढा आहे. तर एकूण खर्च १४०० कोटी रुपयांवर जाणार असल्याने या बसगाड्या भविष्यात पांढरा हत्ती ठरणार असल्याची भीती भाजपने व्यक्त केली आहे.
बेस्ट उपक्रमाने सन २०२२-२३ या वर्षात दोन हजार २३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प बेस्ट समितीला सादर केला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन बेस्टच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य, नगरसेवक विनोद मिश्रा आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट उपस्थित होते.
श्वेतपत्रिका काढावी.... बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग आतापर्यंत तोट्यात होता. परंतु आतापर्यंत नफ्यात असणारा विद्युत विभागही तोट्यात आला आहे. ही वाटचाल अशीच सुरू राहिल्यास बेस्टची अवस्था एसटी महामंडळाप्रमाणे होईल, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली. चालक भाड्याने देण्यास विरोध... बेस्ट उपक्रमातील चालकांना अतिरिक्त ठरवून त्यांना भाड्याने देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र या निर्णयाला आपला तीव्र विरोध असून प्रत्येक आगरांमध्ये भाजप पक्ष कामगारांच्या पाठीशी उभा असेल, असे त्यांनी ठणकावले.
इलेक्ट्रिक बसगाड्यांचे श्रेय लाटले.... बेस्टच्या ताफ्यात आलेल्या प्रत्येक इलेक्ट्रिक बससाठी ५० लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने दिले आहे. परंतु या इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात आल्यानंतर याचे श्रेय शिवसेना घेत आहे. तसेच विद्युत विभागाला कोट्यवधी रुपयांचे अनुदान केंद्र सरकारने देऊ केले आहे. परंतु याला शिवसेना आणि काँग्रेसने नकार दर्शवला होता, असे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी निदर्शनास आणले.