‘मविआ’च्या काळातील उद्योगांवर श्वेतपत्रिका; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:24 AM2022-11-02T07:24:37+5:302022-11-02T07:24:50+5:30
राज्यात उद्योगांबाबत नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे.
मुंबई : राज्यातील उद्योग गुजरातला गेल्यामुळे शिंदे - फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात सुरू आरोप - प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती उद्योग महाराष्ट्रात आले, गुजरातला गेलेले उद्योग कुणामुळे गेले हे जनतेसमोर आणण्यासाठी महिनाभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सामंत यांनी केली.
मागील १५ दिवस आम्ही राज्यात मेगा प्रकल्प आणत आहोत, दुसरीकडे राज्यात मेगा खोटे बोलण्याचेही प्रयोग सुरू आहेत.
राज्यात उद्योगांबाबत नकारात्मक वातावरण तयार केले जात आहे. उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले, याचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम सुरू आहे, असे सांगून याबाबतही वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी ही श्वेतपत्रिका काढली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात किती उद्योगांबरोबर सामंजस्य करार झाले, त्याची सद्यस्थिती काय आहे, हेही या श्वेतपत्रिकेद्वारे समोर आणले जाणार असल्याचे ते म्हणाले.