Join us

उपनगरीय रेल्वेसाठी आता श्वेतपत्रिका -सुरेश प्रभू

By admin | Published: June 10, 2015 3:06 AM

प्रवाशांना सोयीसुविधा देताना येणाऱ्या अडचणी, रेल्वे प्रकल्पांसाठी लागणारा निधी यासह अन्य कारणांमुळे रेल्वे आणि प्रवाशांसमोर आव्हान उभे राहिले आहे

मुंबई : प्रवाशांना सोयीसुविधा देताना येणाऱ्या अडचणी, रेल्वे प्रकल्पांसाठी लागणारा निधी यासह अन्य कारणांमुळे रेल्वे आणि प्रवाशांसमोर आव्हान उभे राहिले आहे. यातून मार्ग काढता यावा यासाठी एक श्वेतपत्रिका बनविण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ही श्वेतपत्रिका तयार करताना प्रवासी आणि तज्ज्ञांचे मत घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या डीसी-एसी परावर्तनाचे औपचारिक उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी वांद्रे येथील रेल्वे कॅम्पसमध्ये करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मुंबईतील प्रवाशांना सोयीसुविधा पुरविताना अनेक अडचणींचा सामना रेल्वेला करावा लागतो. हे पाहता उपनगरी रेल्वेचे प्रश्न सोडविणारी आणि मार्गदर्शक ठरणारी श्वेतपत्रिका एमआरव्हीसीला (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) तयार करण्यास सांगण्यात आल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. ही श्वेतपत्रिका जुलै महिन्यापर्यंत तयार होईल आणि ती श्वेतपत्रिका प्रवाशांसमोर ठेवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले, की सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला मिळून जवळपास १,१00 कोटींचा तोटा होत आहे. यावर श्वेतपत्रिकेत अधिक भर देण्यात येणार आहे. हा तोटा कसा कमी करता येईल, यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठीही या श्वेतपत्रिकेची मदत होईल.