मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलन व्यवहारातून बाद ठरवल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रकरणी सरकारने तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. चलनबंदीच्या घोषणेने देशभरात हाहाकार माजला आहे. असंघटित कामगार, किरकोळ व घाऊक विक्रेते यांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. परिणामी एक प्रकारची कृत्रिम टंचाई आणि मंदीला भारतीय बाजारपेठ आणि नागरिक तोंड देत आहेत. म्हणून आम्ही भारत सरकारकडे सदर प्रसंगी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत आहोत, असेही ते म्हणाले. ज्या चलनी नोटा व्यवहारातून बाद ठरवल्या, त्या एकूण चलनाच्या किती टक्के होत्या? उद्भवणाऱ्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण कोणती पर्यायी व्यवस्था आखलेली होती आणि रद्द करण्यात आलेल्या बँक नोटांचे निर्मितीमूल्य किती होते, अशा प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणीही आव्हाड यांनी केली.
‘चलनबंदीवर श्वेतपत्रिका काढा’
By admin | Published: November 16, 2016 6:07 AM