Join us

नाना-तनुश्रीपैकी दोषी कोण, हे ठरविणारे आपण कोण ? शिवराज पाटील-चाकूरकरांचा सवाल!

By राजा माने | Published: October 12, 2018 5:13 PM

"मी,टू" ट्रेण्ड राजकारण आणि अन्य क्षेत्रात आला तर कसे, असे विचारले असता, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा आदर राखण्यासोबतच सर्वार्थाने सुरक्षितता दिली पाहिजे

मुंबई - अभिनेता नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या "मी,टू" वादाने पोलिस स्टेशनची पायरी गाठली असतानाच माजी गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. लातूर येथे लोकमत ऑनलाईन टीमशी ते बोलले. मुळात अशा प्रकरणांची किती चर्चा करायची, हे समाजानेच ठरविण्याची वेळ आली आहे, हे सांगतानाच ते म्हणाले, "कधी काळी घडल्याचा दावा केला जात असलेल्या या प्रकरणात नाना पाटेकर दोषी की तनुश्री दत्ता दोषी, हे ठरविणारे मी किंवा तुम्ही कोण?"

"मी,टू" ट्रेण्ड राजकारण आणि अन्य क्षेत्रात आला तर कसे, असे विचारले असता, प्रत्येक क्षेत्रात महिलांचा आदर राखण्यासोबतच सर्वार्थाने सुरक्षितता दिली पाहिजे, हे आपला कायदा सांगतो. पूर्वी अशा प्रकरणात घटना घडल्यानंतर त्याची तक्रार करण्यासाठी कायदेशीर कालमर्यादा होती. आता ती नाही. आज देशात बलात्काराची बातमी नाही, असा एक दिवस जात नाही. त्यात अशी प्रकरणे अधिकच अस्वस्थ करतात. आपल्या देशात 22 लाखांहून अधिक पोलिस कर्मचारी आहेत. त्यापैकी पाच-सहा लाख पोलीस सीमावर्ती भागात असतात, मग उरलेल्या पोलिसांनी कुठे आणि काय पहायचं. त्यामुळे वेबसाईटस आणि सोशल मीडीयानेच जबाबदारीचे भान ठेवावे लागेल, असेही चाकूरकर यांनी लोकमतशी बोलताना म्हटले. दरम्यान, #Metoo या मोहिमेमुळे विविध क्षेत्रातील पीडित महिला पुढे येऊन आपले दु:ख सांगत आहेत. तर, विनाकारण कुणालाही यात अडकवू नये, असे अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

टॅग्स :शिवराज पाटील चाकूरकरनाना पाटेकरमीटू