लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार, गुन्हे शाखेने भावेश भिंडेच्या बँक खात्याची कुंडली काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या जाहिरातीचे पैशांचा फायदा कुणा कुणाला होत होता, याबाबत गुन्हे शाखा तपास करणार आहे.
भावेश भिंडेला शुक्रवारी मुंबई आणून न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी भावेशच्या वकिलाने न्यायालयात दिलेल्या माहितीत, होर्डिंगचे वर्षाकाठी ४ कोटी रुपये रेल्वे पोलिस आयुक्तालयाला देत असल्याचे सांगितले, तसेच इगो मीडियाच्या डायरेक्टरपदी जान्हवी म्हात्रे होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भावेश भिंडेची नियुक्ती करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील दुर्घटनेप्रकरणी भावेशविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्याची कागदपत्रे मागविण्यात आली. भावेश या कंपनीत किती वर्षांपासून होता? या परवानगी कशा मिळविल्या? यामध्ये आणखीन किती जणांचा सहभाग आहे? तसेच भावेशच्या जाहिरातीच्या व्यवसायातील पैसे कुठे कुठे जात होते? यामागे आणखीन किती जणांचा सहभाग आहे? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. या परवानगीसाठी कोणी मदत केली? या सर्व बाबी पडताळणी सुरू आहे.
२६ मेपर्यंत भावेशला पोलिस कोठडी
- होर्डिंग दुर्घटनेतील प्रमुख आरोपी भावेश भिंडे याला दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भिंडेला पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी राजस्थानातून अटक केली होती.
- होर्डिंग कोसळून १६ जण ठार झाल्याच्या दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी भिंडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो फरार झाला होता. अटकेनंतर भिंडेला शुक्रवारी मुंबईत आणण्यात आले.
- अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के.एस. झंवर यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले. भिंडेची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले. भिंडेच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भिंडेला २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.