गुलाबरावांनी उल्लेख केलेले 'ते' चार कोंडाळे कोण?, ज्यांनी उद्धव ठाकरेंना बावरट केलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:21 AM2022-07-05T11:21:47+5:302022-07-05T11:24:01+5:30

शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या गुलाबराव पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं होतं.

Who are the four shiv sena leader which mla gulabrao patil mention in his speech in vidhan sabha | गुलाबरावांनी उल्लेख केलेले 'ते' चार कोंडाळे कोण?, ज्यांनी उद्धव ठाकरेंना बावरट केलं!

गुलाबरावांनी उल्लेख केलेले 'ते' चार कोंडाळे कोण?, ज्यांनी उद्धव ठाकरेंना बावरट केलं!

googlenewsNext

मुंबई

राज्याच्या विधानसभेत सोमवारी घेण्यात आलेली बहुमत चाचणी शिंदे सरकारनं १६४ मतांनी जिंकली आणि महाराष्ट्रात 'शिंदे'शाहीला सुरुवात झाली. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अभिनंदन प्रस्तावात विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यात बंडखोर आमदारांच्या भाषणाकडे सर्वांचं विशेष लक्ष लागून होतं. त्यात शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेल्या गुलाबराव पाटील नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं होतं. गुलाबराव पाटील यांनी आपल्या रांगड्या शैलीत जोरदार फटकेबाजी केली आणि यात त्यांनी आपली खदखद देखील मनमोकळेपणानं बोलून दाखवली. 

आदित्य ठाकरेंचे दौरे पाहा, कधी आले? एकटे शिंदे पाचवेळा जळगावात आले- गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवर उघड टीका केली. यात विशेषत: संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश होता. "चार लोकांच्या कोंडाळ्यानं आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं", असं विधान गुलाबराव पाटील यांनी भर विधानसभेत केलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांचा रोख असलेले ते चार नेते कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
"अनेकदा आमचे आमदार व्यथा मांडायला जायचे. पण चहापेक्षा किटली गरम असा प्रकार होता. आम्ही सहज आमदार झालो नाही. भगवा झेंडा हाती घेऊन इथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. चार लोकांच्या कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव साहेबांना बावरट केलं. ज्यांची लायकी नाही ते आमच्यावर बोलतात आमची मतं घेऊन खासदार होतात. याच डुकरांची मतं घेऊन निवडून येतात. काय शब्द वापरतात, हे कोण सहन करणार?", अशी खदखद गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

"या चार लोकांच्या कोंडाळ्याने उद्धवसाहेबांना बावरट केलं"; गुलाबराव पाटील भडकले

"आजही उद्धव ठाकरेंना आमची हातजोडून विनंती आहे. हे जे आजूबाजूचे कोंबडे आहेत त्यांना बाजूला करा. जे तुम्हाला पट्टी बांधून ध्रूतराष्ट्रासारखे सांगताहेत त्यांना लांब करा. तुमची माणसं तुमच्यापासून गेलेले नाहीत त्यांना लोटलं गेलंय. नाहीतर ही सर्वसामान्य माणसं आणि एकनाथ शिंदे साहेब असे दूर गेले नसते. त्यांचं एक स्टेटमेंट दाखवा इतक्या वर्षांच्या इतिहासात की त्यांची नाराजी आहे. आमदार जेव्हा त्यांच्याकडे वारंवार जाऊन आपली व्यथा सांगायचे आणि हे जाऊन तिथं सांगायचे तरी काहीच केलं जायचं नाही. हे काय आहे?", असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबरावांचा रोख नेमका कुणाकडे?
गुलाबरावांनी आपल्या संपूर्ण भाषणात दोन जणांनी उघड नावं घेतली. यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचा समावेश होता. पण त्यांचा मुख्यत: रोख आमदारांच्या मतांवर निवडून येणाऱ्या खासदारांकडे होता. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी उल्लेख केलेल्या चार जणांमध्ये संजय राऊत, अनिल देसाई यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसंच गुलाबरावांचा इशारा अनिल परब आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडेही होता का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षासंबंधीचे निर्णय घेण्यात आणि 'मातोश्री'वर सध्या अनिल परब यांना विशेष महत्व प्राप्त झाल्याचं याआधीही वारंवार म्हटलं गेलं आहे. तसंच आमदार असूनही मुख्यमंत्र्यांना भेटायचं म्हटलं की मुख्यमंत्र्यांच्या जवळ असलेल्या याच चार व्यक्तींची आधी परवानगी घ्यावी लागत होती असंही नाराज आमदारांनी बोलून दाखवलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांना ओळखलं जातं. त्यामुळे गुलाबरावांच्या 'त्या' चार जणांच्या लिस्टमध्ये मिलिंद नार्वेकरांच्या समावेश असल्याचं बोललं जात आहे. 

शिवसेनेत बंडखोरी ही काही नवीन नाही. याआधी बंडखोरांनी पक्षात काही लोकांना मिळणारी व्हीआयपी ट्रीटमेंट यावर आक्षेप घेत पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शिवसेना पक्ष चार लोकांच्या हातात गेल्यानं नाराज असल्याचं बोलून दाखवलं होतं. "माझ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी त्यांच्या आजूबाजूच्या चार बडव्यांची परवानगी मला घ्यावी लागते", असं राज ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. तसंच नारायण राणेंनीही त्यावेळी थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करत पक्ष सोडला होता.

Web Title: Who are the four shiv sena leader which mla gulabrao patil mention in his speech in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.