जे जे क्लिनिकल ट्रायल प्रकरणातील ‘ते’ १५ कर्मचारी कोण?; डॉक्टरांनंतर आता कर्मचाऱ्यांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 08:32 AM2023-07-12T08:32:24+5:302023-07-12T08:32:47+5:30
या रुग्णालयात ज्या खोलीत क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या त्याठिकाणी १५पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे चौकशी समितीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे
मुंबई : जे जे रुग्णालयाच्या वादग्रत क्लिनिकल ट्रायलप्रकरणी डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर आता क्लिनिकल ट्रायलच्या खोलीत जे १५ कर्मचारी काम करत होते, त्याची माहिती गोळा करण्याचे चौकशी समितीने सुरू केले आहे. विशेष म्हणजे या ट्रायलकरिता जी कंपनी कार्यरत होती, त्यांच्याकडून याबाबत लेखी खुलासा मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या पाच वर्षे सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलप्रकरणी जे जे रुग्णालयाच्या प्रशासनाने समिती नेमली आहे. डॉ. अमिता जोशी यांच्या अध्यक्षेतेखाली ही समिती काम करणार असून, त्यामध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. संजय सुरासे यांचा समावेश आहे. या समितीने २४ डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर प्राथमिक अहवाल रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी अंतिम अहवाल अजूनही बाकी असल्याचे सांगण्यात येते. यात दोन प्राध्यापकांवर क्लिनिकल ट्रायलसाठी ज्या रीतसर परवानगी घेणे आवश्यक होते, त्या घेतल्या नसल्याचे सांगण्यात येते.
या रुग्णालयात ज्या खोलीत क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या त्याठिकाणी १५पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे चौकशी समितीने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. हे कर्मचारी रुग्णालयाचे नव्हते. ते येथे कोणत्या कारणासाठी कार्यरत होते, याची माहिती चौकशी समितीने माहिती मागितली आहे. गेले अनेक दिवस समिती ही माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. जे जे रुग्णालय देणगी समितीच्या तिजोरीत महसूल जमा होण्यास सुरुवात झाली असून, दिवसागणिक महसूल जमा होत आहे. महसुलाची रक्कम कोट्यवधींच्या घरात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
१५ ते २० ट्रायल अद्यापही सुरूच
जे जे रुग्णालयात सध्याच्या घडीला १५ ते २० क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. त्या तशाच पद्धतीने सुरू ठेवाव्यात अशा पद्धतीची शिफारस चौकशी समितीने केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. क्लिनिकल ट्रायल या देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत होत असतात. मात्र त्या करताना रुग्णालय प्रशासनाची योग्य पद्धतीने परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच त्या संबंधित कंपनीबरोबर रीतसर करार करणे अपेक्षित असून त्याच्याद्वारे जो काही महसूल होतो तो रुग्णालयाच्या तिजोरीत जमा करण्याची गरज असते.