Join us

कोण आहे तू, तुझा जीव केवढाय, राणेंचा संजय राऊतांवर पुन्हा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 4:33 PM

संजय राऊत यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तुम्हाला गुंड म्हटलंय, एकमेकांवरील आरोपात महाराष्ट्राचं हित काय, असा प्रश्न राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता.

ठळक मुद्देमाझा शिवसेनेशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. माझ्यापासून ठाकरे कुटुंबीयाला कुठलाही त्रास होणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना त्यावेळी दिला होता. तो शब्द माझ्याकडून साहेबांनी घेतला, अशी आठवण राणेंनी सांगितली.

मुंबई - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कणकवलीत प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी अग्रलेख लिहिला, आता मी 17 सप्टेंबरनंतर प्रहार मधून लिहिणार, असा थेट इशारा राणेंनी दिला. त्यानंतर, पुन्हा एकदा राणेंनी संजय राऊतांना लक्ष्य केलंय. संजय राऊत शिवसेना संपवायचं काम करतोय, असंही राणे म्हणाले.  

संजय राऊत यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी तुम्हाला गुंड म्हटलंय, एकमेकांवरील आरोपात महाराष्ट्राचं हित काय, असा प्रश्न राणेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राणेंना राऊतांवर निशाणा साधला. 'सत्ता त्यांचीय, महाराष्ट्राच हित त्यांना समजलं पाहिजे. मी कधीही पहिल्यांदा कोणावर आरोप केला नाही. संजय राऊतांनी हे धंदे करू नये, कोण आहे तू, तुझा जीव केवढाय, का करतोय हे सगळं. शिवसेना संपवायचंच काम करतोय, असे म्हणत नारायण राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर प्रहार केला आहे. 

माझा शिवसेनेशी कुठलाही वैयक्तिक वाद नाही. माझ्यापासून ठाकरे कुटुंबीयाला कुठलाही त्रास होणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना त्यावेळी दिला होता. तो शब्द माझ्याकडून साहेबांनी घेतला, अशी आठवण राणेंनी सांगितली. तसेच, उठसूठ नारायण राणे... नारायण राणे... असं केल्यावर काय होणार. माझं वृत्तपत्र आहे, लवकरच चॅनेलही येईल. मी यापूर्वी कधीही आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंवर बोललो नाही. पण, संजय राऊतांच्या माध्यमातून हे सर्व सुरू झालं. त्यामुळे, मला उत्तर द्यावं लागलं. मी ऐकून घेणाऱ्यांपैकी नाही, असंही राणेंनी स्पष्ट केलं. 

विधायक कामासाठी लिहित नाही 

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून मदत होईल, असं तो लिहित नाही. सामाजिक, विधायक, विकसनशील कामासाठी त्याचा अग्रलेख नाही. माझ्या घरावर आले, माझ्या मुलापर्यंत आले, मी विसरणार नाही. माझा त्यांना इशारा आहे, माझ्यातील नारायण राणे जागा करू नका, असं म्हणत नारायण राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :नारायण राणे संजय राऊतशिवसेना