रेसकोर्समधल्या तबेल्यांचा खर्च कोणाच्या माथी? अंदाजे ९७ कोटींचा खर्च येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 08:19 AM2024-03-13T08:19:34+5:302024-03-13T08:20:09+5:30

पालिका झोपड्यांचे सर्वेक्षण करणार 

who bears the cost of race course stables it will cost approximately 97 crore | रेसकोर्समधल्या तबेल्यांचा खर्च कोणाच्या माथी? अंदाजे ९७ कोटींचा खर्च येणार 

रेसकोर्समधल्या तबेल्यांचा खर्च कोणाच्या माथी? अंदाजे ९७ कोटींचा खर्च येणार 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य  ‘मुंबई सेंट्रल पार्क’ विकसित करण्यास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली. रेसकोर्सवर उभारल्या जाणाऱ्या सेंट्रल पार्कसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. (आरडब्ल्यूआयटीसी)चे या परिसरातील घोड्यांचे तबेले पाडावे लागणार आहेत. 

सरकारकडून हे तबेले पुन्हा बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची शहानिशा करत नियमानुसार कार्यवाही करावी आणि खर्चाची तरतूद करावी, अशा सूचना केल्या आहेत.  रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. (आरडब्ल्यूआयटीसी) च्या मागणीनुसार हा खर्च पालिका किंवा सरकारने करावा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तबेल्यांच्या पुनर्बांधकामासाठी येणारा अंदाजे ९७ कोटींचा खर्च कोणाच्या माथी पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

चर्चेअंती होणार चाचपणी

सेंट्रल पार्क  उभारताना महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात असलेल्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण महापालिका करणार असून या झोपडपट्टीधारकांचे आसपासच्या झोपडपट्टी प्रकल्पांमध्ये पुनर्वसन करण्याबाबत प्राधिकरणासोबत बैठक घेऊन चर्चा करून चाचपणी करणार आहे. या झोपड्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी ही पालिकेची आणि राज्य शासनाची असणार आहे. या झोपडपट्यांच्या पुनर्वसनाचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा हा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लि. (आरडब्ल्यूआयटीसी) यांच्यावर पडणार नाही, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

धावपट्टीला पार्कचा अडथळा नको 

रेसकोर्सच्या २११ एकर जागेपैकी १२० एकरावर न्यूयॉर्क, लंडन येथील पार्कच्या धर्तीवर हे उद्यान विकसित करणार आहे. दर्शकांना बसल्या जागेतून रेसकोर्सची धावपट्टी दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे सेंट्रल पार्कचा आराखडा तयार करताना दर्शकांना अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. 

पुढील ४ वर्षे फक्त खोदकाम

आदित्य ठाकरेंचे प्रश्न रेसकोर्सच्या काही भागात असलेल्या राहत्या घराच्या पुनर्वसनाबाबत अद्याप स्पष्टता नसून त्यांना या बदल्यात काय मोबदला मिळणार याची सरकारकडून काही माहिती  दिलेली नाही. याउलट या परिसरात लाडक्या विकासकाकडून एसआरए योजनेचे काम देण्याचे नियोजन सरकारचे आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. कोस्टल रोड बनविताना भूमिगत पार्किंगची सोय केलेली असताना पुन्हा रेसकोर्सच्या जागेवर भूमिगत पार्किंगची गरज का लागणार आहे? याशिवाय रेसकोर्सच्या जागेवर खासगी घाेड्यांचे तबेले पुन्हा बांधण्यासाठी मुंबईकरांचे १०० कोटी खर्च केले जाणार का? अशी टीकाही त्यांनी केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे पुढच्या ४ वर्षांसाठी मुंबईकरांना रेसकोर्सवर फक्त खोदकाम दिसणार असून वाढत्या प्रदूषणाला आणि पुन्हा एकदा हवेचा गुणवत्ता निर्देशांकात घट होणार आहे, अशी टीका त्यांनी केली. 


 

Web Title: who bears the cost of race course stables it will cost approximately 97 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई