Join us

आनंदाचा शिधाच्या माध्यमातून नफेखोरीचा फायदा कोणाला? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 4:38 PM

 शिंदे-फडणवीस सरकारकडून या वर्षीही शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत आहे.

मुंबई-  शिंदे-फडणवीस सरकारने या  वर्षीही शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत या शिधाचे वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे, आता या शिधावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिधाच्या कंत्राटावरुन सरकारला सवाल केले आहेत. 

 

धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

सुषमा अंधारे म्हणाल्या, आनंदाचा शिधा या अंतर्गत दारिद्रदेषेखालील लोकांना एक किलो साखर, एक किलो चनाडाळ, तेल आणि रवा मैदा देण्यासाठी एक योजना सरकारने आणली आहे. मात्र खरच ते मिळत आहे का? कारण काही ठिकाणी आम्ही तपासून बघत आहे ती ४७० ग्रॅम किंवा ४८० ग्रम निघत आहे. मुळात एक किलोमध्ये कुणाचीही दिवाळी होत नाही. एखाद्याला गरज म्हणून याचा विचार केला तर बुडत्याला काडीचा आधार म्हणता येईल. शासन सांगतंय एक कोटी लोकांना आम्ही शिधा दिला. जर एक कोटी लोकांना शिधा दिला असेल तर पॅकेटामागे २० आणि ३० ग्रॅम काढले, किती रवा, मैदा बाजूला निघतो त्यातून कोणाला याचा फायदा निघतो, असा सवालही अंधारे यांनी केला. 

सरकारच्या तिजोरीतील पैसे गोरगरिबांच्या योजनेच्या नावाखाली ज्या कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या खिशात जाणार आहेत, ते कंत्राटदार आणि ठेकेदार ते कोणत्या राजकीय नेत्यांचे, पक्षांचे लागेबांधे असणारे आहेत याची चौकशी झाली पहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली. 

आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार

दरवर्षी शासनाकडून दिवाळीत आनंदाचा शिधा रेशनकार्डधारकांना दिला जातो. यंदा मात्र तो गणेशोत्सवातही देण्यात आला. आता दिवाळीचा शिधा देण्याचे नियोजन सुरू आहे. गणपतीसाठी १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या किटमध्ये देण्यात आले होते. आता दिवाळीच्या शिधामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तू वाढविण्यात आल्या आहेत परंतु त्या अर्धा किलोने कमी झाल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळेल. जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, गणपतीचा शिधा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचला नाही. किटमध्ये काही वस्तू कमी आल्या, अशा तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या. त्याची चौकशी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत शिवाय दिवाळीच्या शिधा वाटपात या त्रुटी राहणार नसल्याची खबरदारी पुरवठा विभाग घेत आहे.

टॅग्स :सुषमा अंधारेएकनाथ शिंदेशिवसेना