मुंबईचा ‘बॉस’ कोण?
By admin | Published: February 21, 2017 04:39 AM2017-02-21T04:39:57+5:302017-02-21T04:52:10+5:30
युतीचा २५ वर्षांनंतर मोडलेला संसार, काँग्रेसमध्ये उफाळून आलेली गटबाजी, एमआयएमचा वाढता प्रभाव, मनसेला पडलेले
शेफाली परब / मुंबई
युतीचा २५ वर्षांनंतर मोडलेला संसार, काँग्रेसमध्ये उफाळून आलेली गटबाजी, एमआयएमचा वाढता प्रभाव, मनसेला पडलेले खिंडार अशा परिस्थितीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे़ स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागली आहे़ त्यामुळे मतदारराजाचा कौल पारड्यात पडून मंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ‘काबील’ ठरण्यासाठी आपापल्या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोठी चुरस मंगळवारी राजकीय पक्षांत असणार आहे़
‘मिशन शंभर’ जाहीर करून भाजपाने गेल्या वर्षापासूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकले़ त्यात प्रभाग फेररचनेने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली़ युती तुटल्यानंतर शिवसेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये होणारे राडे, शिवसेनेने फेटाळलेला मनसेचा युतीचा प्रस्ताव आणि काँग्रेसमध्ये पेटलेल्या गटातटांच्या राजकारणाने निवडणुकीचे वातावरण तापवले़ प्रतिस्पर्धी उमेदवारांवर धडकणाऱ्या प्रचारफेऱ्या, पैशांचे वाटप, हाणामारीच्या प्रसंगांनी प्रचार मोहिमांमध्ये रंगत आणली़ भाजपाने शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयाबाहेरच जाहीर सभा घेऊन आव्हान दिले़ तर शिवसेनेने मैदान बुक करून मनसेच्या जाहीर सभेत खो घातला़, अशी प्रतिस्पर्ध्याची नाकाबंदी करीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या़
प्रतिष्ठा पणाला़
या वेळेस उमेदवारांचीच नव्हे तर पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे़ आतापर्यंत ४० चा आकडाही पार करू न शकलेल्या भाजपाने थेट शंभरावर जाण्याचा दावा केला आहे़ रिपब्लिकन पक्षाला आपल्याकडे वळवून महापौर आणि उपमहापौरपदाचे दावेदारही जाहीर झाले आहेत़ त्यामुळे भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे़ तर सत्तेत भागीदार असलेल्यांनीच घोटाळेबाज ठरविल्यामुळे आपली ताकद दाखवून देण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे़ अंतर्गत गटबाजी व बंडखोरीने मुंबई सत्तेवर येण्याचे काँग्रेसचे स्वप्न अधांतरी आहे. खिंडार पडलेल्या मनसेसमोर आपले इंजीन रुळावर ठेवण्याचे आव्हान आहे़
काही प्रतिष्ठेच्या लढती़
तेजस्विनी घोसाळकर (शिवसेना) विद्यमान नगरसेवक अभिषेक
घोसाळकर यांच्या पत्नी वि. शीतल म्हात्रे (काँग्रेस) विद्यमान नगरसेवक
नगरसेविका रिद्धी खुरसंगे (शिवसेना) वि. प्रकाश दरेकर (भाजपा)
स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे (सेना) वि. जोत्स्ना दिघे (काँग्रेस)
हेमंत साळवी (शिवसेना) वि. बबलू पांचाळ (भाजपा)
खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे (शिवसेना)
वि बबलू पांचाळ यांच्या पत्नी अनिता पांचाळ (भाजपा)
माजी महापौर विशाखा राऊत (शिवसेना) वि. मनसेचे गटनेते
संदीप देशपांडे याच्या पत्नी स्वप्ना देशपांडे (मनसे)
सेनेचे नगरसेवक सुरेंद्र बागलकर वि. भाजपाचे माजी आमदार अतुल शहा