मुंबई - राज्यात धुळवड साजरी होत असताना मुंबईत होळीनिमित्ताने रंगांची उधळण होत होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी होत रंगांची उधळण केली, सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना फपडणवीसांनी जुन्या मित्रांना चिमटा काढला. तसेच, कुठलीही नशा चांगली नाही, मग ती भांग पिऊन असो की राजकारणाची असो, असेही फडणवीसांनी म्हटले होते. फडणवीसांच्या या टीकेला आता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मागच्या काळात कुणीतरी आमच्या मित्रांना खोटं सांगून भांग पाजली होती, अशा आशयाचं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केलाय. 'महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले? असा प्रतिप्रश्न करत भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटलं. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत, महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे, हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे, सत्तेवर आलेल्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे,'' असा पटवार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर केलाय.
मी विधिमंडळाचा अवमान केला नाही
विधिमंडळाची, संसदेची ही एक प्रक्रिया असते. मला हक्कभंगाची नोटीस मिळाली, त्यावेळी मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे, नोटीसला मी उत्तर देऊ शकलो नाही. आता अधिवेशन सुरू झालेल आहे, विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन आणि कशाप्रकारे काय प्रोसेस आहे ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देऊ, असे संजय राऊत यांनी हक्कभंग प्रस्तावाच्या नोटीशीसंदर्भात सांगितले. तसेच, हक्क भंग होईल असं काहीही विधान मी केलेलं नाही, मी विधिमंडळाचा अवमान केला नाही. एका विशिष्ट गटापुरतं हे विधान मर्यादित होतं. मी त्या विशिष्ट गटासंदर्भात जो शब्द वापरला चोर, हा अतिशय योग्य आहे, असेही राऊत यांनी म्हटले.
काय म्हणाले होते फडणवीस
'आमचे काही मित्र आहेत. त्यांना मागच्या काळात कुणीतरी खोटं सांगून भांग पाजली होती. त्यानंतर काही दिवस त्यांचं जे काही चालंल होतं, ते पाहून मजा आली. कुणी गाणं म्हणत होतं, कुणी रडत होतं. पण मी हे सांगण्याचा प्रयत्न केला की, अशी नशा करण्यापेक्षा भक्तीचा, संगीताचा किंवा कामाचा नशा करावा'.