पालिकेवर डल्ला कोणाचा ?

By admin | Published: October 4, 2015 03:57 AM2015-10-04T03:57:39+5:302015-10-04T03:57:39+5:30

मुंबई महापालिकेतील नालेसफाई घोटाळा उघड झाल्यानंतर रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्याची मागणी खुद्द महापौरांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापौरांच्या मागणीचे

Who is the controller of the corporation? | पालिकेवर डल्ला कोणाचा ?

पालिकेवर डल्ला कोणाचा ?

Next

मुंबई : मुंबई महापालिकेतील नालेसफाई घोटाळा उघड झाल्यानंतर रस्ते दुरुस्तीच्या घोटाळ्याची मागणी खुद्द महापौरांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. महापौरांच्या मागणीचे पत्र बाहेर येताच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपानेही रस्ते घोटाळ्याची मागणी केल्याने श्रीमंत पालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांपैकी नक्की कोण डल्ला मारतंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ते चौकशीच्या मागणीवर सेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर न केल्याने मुंबईकरांचे लक्ष सेनेच्या भूमिकेकडे लागले आहे.
महापौरांच्या रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीनंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन रस्ते घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली होती. शिवाय रस्त्यावरील डांबर कंत्राटदार खातात की काय? ही मुंबईकरांच्या मनातील शंका चौकशीअंती दूर करा, अशी विनवणीही शेलार यांनी या वेळी केली होती. या भेटीला दोन दिवस उलटत नाहीत तोवर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही रस्ते घोटाळ्याप्रकरणी सेना-भाजपावर टीकेची झोड उठविली आहे. महत्त्वाचे म्हणजे महापौरांच्या पत्रावर भाजपा, काँग्रेस आणि मनसेने तोंडसुख घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही प्रशासनातील सर्वच खात्यांमधील भ्रष्टाचाराची मागणी केली आहे.
मुंबई महापालिका हद्दीतील रस्ते बांधणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत आयुक्तांमार्फत त्याची चौकशी करण्याची मागणी केल्याबद्दल महापौर स्नेहल आंबेकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. नालेसफाई आणि रस्ते बांधणीच नव्हे तर महापालिकेच्या जवळपास प्रत्येक विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. ही बाब आम्ही गेली अनेक वर्षे सांगत आहोत. आता महापौरांच्या पत्रप्रपंचावरून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि भाजपा सत्तेत असूनही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप का करत आहेत, हा प्रश्न मात्र निरुत्तरितच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

पत्र नक्की कुठे
टाइप झाले?
महापौरांनी आयुक्तांना दिलेल्या पत्राबाबत राष्ट्रवादीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पत्र कुठे टाइप झाले, याचा शोध घेणे गरजेचे आहे. कारण कंत्राट न मिळाल्याच्या रागातूनच एका कंत्राटदाराने ते पत्र तयार केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. महापौरांनी आयुक्तांना दिलेले पत्र नेमके कुठे टाइप झाले याची प्रशासनाने चौकशी करावी, असे पत्र आपण महापालिका आयुक्तांना देणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.

Web Title: Who is the controller of the corporation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.