समस्यांनी पीडित एल वॉर्डचा ‘डॉक्टर’ कोण?
By admin | Published: January 26, 2017 03:45 AM2017-01-26T03:45:21+5:302017-01-26T03:45:21+5:30
महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात तरुण आणि उच्चभ्रू मतदारांना आकर्षित करण्यासाठी, राजकीय पक्षांकडून सुशिक्षित उमेदवारांचा शोध सुरू
महेश चेमटे / मुंबई
महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात तरुण आणि उच्चभ्रू मतदारांना आकर्षित करण्यासाठी, राजकीय पक्षांकडून सुशिक्षित उमेदवारांचा शोध सुरू आहे. कुर्ला पश्चिमेकडील एल वॉर्डमधील १६८ क्रमांकाच्या प्रभागामध्येही याचा प्रत्यय आला आहे. कारण प्रभागातील विद्यमान नगरसेवक डॉक्टर असल्याने, इतर पक्षांनीही तोडीस तोड म्हणून ‘डॉक्टर’ उमेदवारांची निवड करण्यास सुरुवात
केली आहे.
प्रभाग महिला सर्वसाधारण आरक्षण असून, विद्यमान नगरसेवक डॉक्टर आहेत. त्यामुळे ‘लोहा लोहे
का काटता है...’ या उक्तीनुसार अन्य पक्षांकडूनही उच्चशिक्षित उमेदवारांचा शोध सुरू आहे. त्यात एका बड्या पक्षाने डॉक्टर उमेदवार निश्चित केल्याची माहितीही स्थानिकांकडून मिळाली आहे. परिसरातील अनधिकृत बांधकामे, नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, वाहतूककोंडी यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. भाभा रुग्णालयाचा मुद्दाही प्रचारात गाजणार यात दुमत नाही.
प्रभागात कनिष्ठ मध्यमवर्गीयांपासून ते उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्व धर्मीय लोकवस्ती आहे. परिणामी, सर्वांपर्यंत पोहोचत त्यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी उमेदवारांना चांगलीच पायपीट करावी लागणार आहे. प्रभागात सध्या कोणत्याही उमेदवाराचे एकहाती वर्चस्व नसल्याने, या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे, तर विजयी उमेदवार हा अल्प मताधिक्याने निवडून येण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रभागातील समस्येचे निराकरण करण्यासाठी मतदार कोणत्या ‘डॉक्टर’ची निवड करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.