मुंबई : हल्ली कोण, कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही... हे काही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधान नाही. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच यांनीच ही व्यथा मांडलीय! त्याचवेळी ‘येथे आलो नसतो, तर थेट माझ्या भाजपप्रवेशाच्या बातम्या आल्या असत्या,’ अशी कोपरखळी ५२ वर्षे संसदीय राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी मारली... ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा गाजला तो पक्षांतरांवर राजकीय नेत्यांच्या कोट्या, टपल्या आणि संसदीय राजकारणातील आठवणींनी.
काँग्रेस नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्यासह विनोद तावडे, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात, दिवाकर रावते, पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, सुशीलकुमार शिंदे, रामराजे नाईक निंबाळकर, हरिभाऊ बागडे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, आशिष शेलार अशा सर्वपक्षीय वजनदार नेत्यांनी हजेरी लावली. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सोहळा रंगला... मात्र, या सोहळ्याचे केंद्रबिंदू ठरले सरकारचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री. श्रोतृवृंदात बसलेल्या गिरीश महाजनांचा उल्लेख करत जवळपास प्रत्येक नेत्याने पक्षांतरावरून टोलेबाजी केली. पाच-पाच दशकांच्या संसदीय राजकारणाचा धांडोळा घेताना या जाणत्या नेत्यांनी पक्षांतरावरच्या कोपरखळ्या मारल्या, तेव्हा सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
‘काल रात्री माझे जीभ आणि गळ्याचे आॅपरेशन झाले आहे. डॉक्टरांनी मला काही दिवस बोलू नका, कार्यक्रमांना जाऊ नका, असे सांगितले. पण, सध्याचे राजकारण पाहता मी आज कार्यक्रमाला गेलो नाही; तर मी गिरीश महाजन यांच्याबरोबर अमित शहा यांना भेटायला गेल्याच्या बातम्या आल्या असत्या. म्हणून थोडा त्रास झाला, तरी मी आलो,’ या शरद पवारांच्या कोटीने तर सभागृह टाळ्या आणि हशाने दणाणून गेले. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच हर्षवर्धन जाधव पुस्तकामागची भूमिका मांडताना हास्यकल्लोळ उडवून दिला. ‘विधानगाथे’चे निमंत्रण द्यायला मुख्यमंत्र्यांना भेटलो, तर दुसºया दिवशी भलत्याच बातम्या आल्या. ‘विधानगाथा’ भलतीच गाजली. आमदारच नसल्याने मागची पाच वर्षे जरा निवांत वेळ होता म्हणून हे पुस्तक लिहिता आले. भविष्यात असा निवांत वेळ मिळणार नाही, अशी आशा करतो, असे विधान जाधवांनी केल्यावर सभागृहाने दाद दिली. जाधव यांनी संसदीय कार्यमंत्री म्हणून छाप पाडली. संसदीय कार्यमंत्री हा त्या त्या मुख्यमंत्र्यांचा विश्वासू समजला जातो, असे सांगताना सध्या काय स्थिती आहे, हे मला माहित नाही, असा चिमटा अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री आणि तावडेंकडे पाहून काढला. तर, ‘व्यासपीठावर इतकी मंडळी आली आहेत, कोणाकोणाला बोलायला मिळणार असा प्रश्न पडला होता. पण, तुम्ही आम्हा माजींनाही बोलायची संधी दिलीत,’ अशी टोलेबाजी सुशीलकुमार शिंदे यांनी केली. भविष्यात असेच लेखन घडू दे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. हाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनीही टोलेबाजी केली. ‘तुम्ही म्हणता पुस्तक लिहीवे लागेल, असा निवांतपणा नको, तुमचे एक नेते म्हणतात... आमदार व्हा, दुसरे म्हणतात अशीच पुस्तके लिहीत रहा... तुमचं नेमकं काय ठरलंय?’ असा सवाल करतानाच ‘नंतर तुम्ही माझ्या घरीसुद्धा आलात,’ असे मुख्यमंत्री म्हणाले आणि सभागृहाला हसू आवरता आले नाही. ‘हल्ली कोण, कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहीत नसते, की आमच्या पक्षात कोण येणार आहे. पेपरवाल्यांकडूनच दुसºया दिवशी समजते. एवढेच नाही तर अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते,’ अशी खुसखुशीत टिप्पणी करत मुख्यमंत्र्यांनी वातावरण हलके केले.