मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा

By रेश्मा शिवडेकर | Published: June 2, 2024 09:42 PM2024-06-02T21:42:40+5:302024-06-02T21:43:07+5:30

एकिकडे ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ या संघ परिवारातील घटक संघटनेचे मुंबईतील नेते शिवनाथ दराडे यांनी आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे.

Who exactly is the BJP teacher candidate for Mumbai? A claim by both Anil Bornare and Shivnath Darade | मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा

मुंबईची भाजप शिक्षक उमेदवारी नक्की कुणाला? अनिल बोरनारे आणि शिवनाथ दराडे दोघांकडून दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधान परिषदेवरील मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी उद्धवसेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवृत्त सरकारी अधिकारी ज. मो.अभ्यंकर यांचा नियोजन व शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार सुरू असताना ‘भारतीय जनता पक्षा’त (भाजप) अजुनही उमेदवारीवरून घोळ सुरू आहे.

एकिकडे ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ या संघ परिवारातील घटक संघटनेचे मुंबईतील नेते शिवनाथ दराडे यांनी आपणच भाजपचे उमेदवार असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे माजी आमदार रामनाथ मोते यांच्या छत्रछायेखाली अनेक वर्षे परिषदेच्या प्रसिद्धीची धुरा वाहिलेले अनिल बोरनारे भाजपकडून आपणच शिक्षक निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे भाजप किंवा संघाला मानणाऱया शिक्षक मतदारांमध्ये महायुतीचा उमेदवार नेमका कोण, यावरून संभ्रमाचे वातावरण आहे.

महायुतीत सहभागी असलेले मुंबईचे मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे तापलेले असतानाच उद्धवसेनेने अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा करून त्यांना तयारीला लागण्यास सांगितले. परंतु, भाजपने अजुनही आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, दराडे यांनी आपला कार्यअहवाल प्रसिद्ध करून शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. गेले वर्षभर मुंबईतील शिक्षकांचे वेतन, सुट्ट्या, शाळाबाह्य कामे यांवरून कधी अर्जविनंत्या तर कधी आंदोलनाचे हत्यार उपसत ते आपल्या अस्तित्त्वाची जाणीव करून देत आहेत. सध्या शाळेला सुट्टी असल्याने शिक्षक मतदारांशी संपर्क साधण्यासाठी गृहभेटींवर भर आहे. परिषदेच्या २२ पैकी १८ पदाधिकाऱयांनी मुंबईतील शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याकरिता आपल्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा दराडे यांनी केला आहे.

दुसरीकडे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य असलेले बोरनारे यांनी दंड थोपटून आपणही प्रचारात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून ते सर्वत्र आक्रमकपणे प्रचार करत आहे. गेली २५ वर्षे आपण शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत. आपल्या कामाची दखल पक्षाकडून घेतली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोन अर्ज
शुक्रवारी अनिल बोरनारे यांनी निवडणूक कार्यालयातून एक भाजपचा व एक अपक्ष म्हणून असे दोन उमेदवारी अर्ज घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोअर कमिटीत निर्णय
मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी झालेल्या भाजपच्या बैठकीत या दोन्ही जागा भाजप लढवणार असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष  आशिष शेलार यांनी रविवारी स्पष्ट केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाकरिता मतदार नोंदणी भाजपने उत्तमपणे केली आहे. कुणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय पक्षाच्या प्रदेश मध्यवर्ती (कोअर) कमिटीत होईल. त्यानंतर महायुतीच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर उमेदवारीची घोषणा केली जाईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

२६ जूनला मतदान
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलै रोजी होणार आहे.
 

Web Title: Who exactly is the BJP teacher candidate for Mumbai? A claim by both Anil Bornare and Shivnath Darade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा