Join us  

हे ट्विट नक्की कोणी केले...;सीमावादप्रकरणी जयंत पाटलांचा कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 6:45 PM

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद अधिकच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्कम चर्चा झाल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याच बरोबर, आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत ट्विट्ससंदर्भात चर्चाही केली. यावर ते ट्विटर हँडल माझे नाही, असे बोम्मई यांनी म्हटल्याचेही शिंदेंनी सांगितले. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ट्विटरवरुन टोला लगावला आहे.

'कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ?, असा टोला जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली: एकनाथ शिंदे

शिंदे म्हणाले, आज अमित शाह यांनी बैठक बोलावली, या बैठकीला मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि गृहमंत्री उपस्थित होतो. गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात ज्या घटना सुरू होत्या, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला त्रास होऊ नये, मराठी भाषेचा सन्मान व्हावा. तसेच मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये, अशी भूमिका राज्यसरकारची म्हणजेच आमची होती. त्या चर्चेत, गृहमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनीही ते मान्य केले आणि दोन्ही राज्यांत शांततेचे आणि सौहार्दाचे वातावरण रहावे, कुठल्याही प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, अशा प्रकारची सूचना केंद्रिय गृहमंत्र्यांनी दोन्ही राज्यांना दिल्या आहेत.

‘त्या’ वादग्रस्त फेक ट्वीटचा शोध लागला

विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना मुख्यमंत्री आपल्या गटाच्या काही खासदारांशी रामगिरी या नागपुरातील शासकीय निवासस्थानी चर्चा करीत होते. त्याचवेळी बोम्मई यांचा त्यांना फोन आला. मुख्यमंत्री शिंदे आतील खोलीत गेले आणि त्यांची बोम्मई यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर हल्ले झाले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. दोन्ही राज्यांसाठी ही बाब योग्य नाही तेव्हा संयम राखणे आवश्यक आहे, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना यावेळी केली आणि बोम्मई यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :जयंत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस