मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २०१९ची लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मात्र आज जर लोकसभेची निवडणुक झाली, तर शिवसेना फुटीचा मनसेला १४ टक्के फायदा होऊ शकतो, असा अंदाज सर्व्हेमध्ये दिसून येत आहे.
इंडिया टीव्हीने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये आज जर लोकसभेची निवडणुक झाल्यास शिवसेना फुटीचा फायदा नेमका कुणाला आणि किती होणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भाजपाला ४८ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला २१ टक्के, काँग्रेसला १७ टक्के आणि मनसेला १४ टक्के फायदा होण्याचा अंदाज आहे. तसेच आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास शिंदे गटाला ११ जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात आज लोकसभेची निवडणुक झाल्यास एकुण ४८ जागांपैकी भाजपाला २६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदे गटाला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला ६, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ३ आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात. भाजपाला ३६ टक्के मतदान, तर शिंदे गटाला ११ टक्के मतदान मिळण्याचा अंदाज इंडिया टीव्हीने केलेल्या सर्व्हेत दिसून येत आहे.
दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. एकनाथ शिंदेंसोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांचं पाठबळ आहे. तसेच राज्यातील विविध नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे.