...मग हक्काचे रेशन मिळते तरी कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2023 11:42 AM2023-03-26T11:42:40+5:302023-03-26T11:42:49+5:30
गेल्या वर्षात केंद्र सरकारकडून येणारे मोफत अन्नधान्य येथील दुकानातील शिधावाटप कार्डधारकांना अर्धेच दिले होते.
मुंबई : मालाड पश्चिम येथील शिधावाटप दुकानातून अन्नधान्य मिळत नसल्याची ऑनलाइन तक्रार केल्यामुळे तक्रारदारावर दुकानदार व त्याचे सहकारी आणि शिधावाटप कार्यालयातील अधिकारी तक्रार मागे घेण्यासाठी व एन.ओ.सी. देण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यामुळे याप्रकरणी शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या नियंत्रकांकडे पत्राद्वारे कारवाईची मागणी केली असून, कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या वर्षात केंद्र सरकारकडून येणारे मोफत अन्नधान्य येथील दुकानातील शिधावाटप कार्डधारकांना अर्धेच दिले होते. शिवाय सरकारकडून मिळणारे विकतचे अन्नधान्य दिलेच गेले नाही. कार्डधारक दुकानात साहित्य घेण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून मशीनवर अंगठा लावून पूर्ण धान्य दिल्याचे दुकानदार नमूद करून घेत होता. ही बाब कार्डधारकांच्या लक्षात आली असता त्यांनी याबाबत रेशनिंग पोर्टलवर तपासणी केली तेव्हा त्यांना कळले की, दुकानदार त्यांची फसवणूक करून त्यांच्या हक्काचे रेशन त्यांना देतच नाही. म्हणून काही कार्डधारकांनी सरकारच्या पोर्टलवर ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने शिधावाटप कार्यालयातून या दुकानदारावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु असे झाले नाही. आता लोकांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, असे फाइट फॉर राइट फाउंडेशनचे मालाड अध्यक्ष गणेश परदेशी यांचे म्हणणे आहे.