आविष्कार देसाई, अलिबागसरकारने माहितीच्या अधिकाराचे अस्त्र सर्वसामान्यांच्या हातात दिले आहे. या कायद्यामुळे सरकारी बाबूंवर चांगलाच वचक बसला असला तरी, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांच्या माहितीकरिता लावलेल्या फलकावर बदली झालेल्या अधिकाऱ्यांचीच नावे आहेत. त्यामुळे माहिती मागायची कोणाकडे असा प्रश्न येथे येणाऱ्या नागरिकांना पडला आहे. माहितीच्या अधिकारामुळे भ्रष्टाचार रोखण्यात मदत झाली आहे. विविध विकासकामांसाठी किती निधी आला, किती खर्च झाला, कोणामार्फत खर्च झाला, त्याचप्रमाणे महसूल खात्याशी संबंधित असणारी कामे कोणत्या स्थितीत आहेत, अथवा कामे होण्यास का दिरंगाई होते याची माहिती माहितीच्या अधिकारात संबंधित यंत्रणेकडे सर्वसामान्य नागरिकांना मागता येते. २००५च्या या कायद्यानुसार कोणती माहिती कोणत्या अधिकाऱ्याकडे मागायची, त्या अधिकाऱ्याने माहिती दिली नाहीतर, त्याबाबतचे अपील कोणत्या अधिकाऱ्याकडे करायचे अशी सर्व माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी संबंधित कार्यालयामध्ये त्या त्या अधिकाऱ्याचे नाव, हुद्दा, दूरध्वनी क्रमांक लावणे बंधनकारक आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय हे अलिबागला आहे. येथील कार्यालयात लावलेल्या फलकांवर अधिकाऱ्यांची नावे आहेत, मात्र त्यांच्या बदल्या होऊन दोन वर्षे झाली तरीही नावे या फलकावर पहायला मिळत असल्याने कामानिमित्त येणाऱ्यांना माहिती देणारा अधिकारी कोण हेच माहिती होत नाही. जुन्याच अधिकाऱ्यांची नावे पाहून तोही बुचकळ््यात पडतो. सामान्य शाखा, कुळवहिवाट, पाणी, नैसर्गिक आपत्ती, बिन शेती, गृह, खनिकर्म असे महत्त्वाचे विषय निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत. डॉ.धनंजय वीरकर यांची बदली होऊन त्यांच्या जागी आता सतीश बागल आले आहेत. त्यांचे नाव त्या फलकावर नाही, तेथे वीरकर यांचेच नाव आहे. रोजगार हमीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे माहिती मागता येते. फलकावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुभाष सोनावणे यांचे नाव आहे. सध्या सुमंत भांगे हे जिल्हाधिकारी आहेत, त्याचप्रमाणे नियोजन विभागाचे राजेश तितर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता सुनील जाधव आहेत. भूसंपादन विभागाचे जयकृष्ण फड यांचीही बदली झाली आहे. किरण पाणबुडे यांची पुरवठा विभागातून बदली झाली आहे, तरी त्यांचीच नावे आहेत. माहिती अधिकारी म्हणून आपली नियुक्ती आहे याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना आहे का आणि असेल तर संबंधितांना माहितीच्या अधिकारात माहिती देण्यासाठी ते माहिती अधिकारी गंभीर नाहीत हेच येथील फलकांवरुन दिसून येते.
माहिती मागायची कोणाकडे?
By admin | Published: January 11, 2015 11:05 PM